आधी लढाई पक्षासाठी मग आजारपणाशी दोन हात!, जेव्हा लक्ष्मण जगताप ॲम्ब्युलन्समधून विधानसभेत आले होते…
जेव्हा लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून विधानसभेत आले होते... सर्वत्र त्यांच्या या पक्षनिष्ठेची दखल घेतली गेली होती. वाचा...
पिंपरी चिंचवड : राजकीय जीवनात वावरत असताना आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून जगावं लागतं, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण काही लोक या वाक्याला साजेसं जीवन जगतात. त्यातीलच एक म्हणजे भाजपचे (BJP) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप. जेव्हा पक्षाला लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap Passed Away) गरज होती तेव्हा त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अन् पक्षासाठी ॲम्ब्युलन्समधून विधानसभा गाठली…
दिवस होता 10 जून. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत होतं. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना होता. एका-एका मतासाठी लढाई सुरु होती. अशात आपल्या पक्षाला आपली गरज आहे हे लक्षात येताच लक्ष्मण जगताप यांनी ॲम्ब्युलन्समधून विधानसभेत येण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मण जगताप त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासोबत आले होते.विधिमंडळात जात त्यांनी मतदान केलं. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा झाली. पक्षासाठी कायपण!, अशी चर्चा यावेळी सोशल मीडियावर पाहायला मिळाली. पक्षाप्रतिची त्यांची निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. पक्षनिष्ठा असावी तर अशी, अशी चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर रंगली होती.
पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळी ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली असं बोललं जातं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीवाळीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपुष्टात आली.
पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विधानसभेत आल्या होत्या. भाजप आमदार मुक्ता टिळक यांना कर्करोग झाला होता. त्यांना मतदानासाठी आणण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती. मुक्ता टिळक यांचंही काही दिवसांआधी निधन झालं.