प्रत्येक भारतीयाला 2022 पर्यंत पक्कं घर देणार : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7 सप्टेंबर) औरंगाबाद येथे (PM Modi Aurangabad) दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या (AURIC City) भव्य हॉलचे उद्घाटन केले.
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7 सप्टेंबर) औरंगाबाद येथे (PM Modi Aurangabad) दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या (AURIC City) भव्य हॉलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बचत गटांच्या महिलांनाही संबोधित केलं. देशातील प्रत्येक कुटुंबाला 2022 पर्यंत आपल्या स्वप्नातील पक्कं घर देणार असल्याचीही घोषणा यावेळी मोदींनी केली.
मोदी म्हणाले, “2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक कुटुंबाला 2022 पर्यंत आपल्या स्वप्नातील पक्कं घर देणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आम्हाला तयार करायचं आहे. कमीत कमी वेळेत जास्त सुविधा देणं यालाच आमचं प्राधान्य आहे. आम्ही वेगवेगळ्या सरकारी योजनांना एकत्र केलं आणि त्यामुळे नागरिकांना आपलं पक्क घरं बनवायला मदत झाली. घर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे तयार व्हावे यासाठीही आम्ही प्रयत्न केले. रेरा कायदा आणून घरं घेणाऱ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या.”
औरंगाबादमध्ये बोलताना मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. तसेच गौरी आणि गणपतीचे दिवस असतानाही महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमीत्त नाईक यांना मराठीतून अभिवादन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते आणि मंत्री उपस्थित होते.
पंकजा मुंडेंचा बहिण असा उल्लेख करत कौतुक
मोदींनी या कार्यक्रमात बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहिण खासदार प्रितम मुंडे यांचाही आवर्जून उल्लेख केला. त्यांनी पंकजा मुंडेंचा बहिण असा उल्लेख करत त्यांच्या कामाचे कौतुक केले. भविष्यात औरंगाबादमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी येथील तरुणांना रोजगाराचेही आश्वासन दिले.
‘महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली’
आपल्या सरकारने केलेले आश्वासन सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांमध्ये पूर्ण केल्याचंही मोदींनी सांगितलं. ते म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी मी आलो होतो. त्यावेळी मी महिलांना धुरापासून मुक्त करण्याविषयी बोललो होतो. मला अभिमान आहे की सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत हे काम पूर्ण झालं आहे. देशात असं एकही कुटुंब नसेल ज्याच्या घरात सिलिंडर पोहचला नाही.”
‘महिलांना पाण्यासाठी होणारा त्रासही कमी होणार’
देशातील महिलांना पाण्यासाठी किती त्रास होतो हे माहित असल्याचं मोदी म्हणाले. तसेच हा त्रास कमी करण्यासाठी योजना आणल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “राम मनोहर लोहिया यांनी 1960-70 मध्ये शौचालय आणि पाणी हे महिलांचे दोन प्रमुख प्रश्न असल्याचे म्हटले होते. लोहिया गेले, सरकारं आली आणि गेली. पण कुणीच याकडं पाहिलं नाही. मात्र, आम्ही या प्रश्नांवर ठाण मांडून बसलो आणि हे दोन्ही प्रश्न सोडवून दाखवले.” यावेळी मोदींनी जलजीवन मिशनसाठी साडेतीन कोटींच्या तरतुदीचीही घोषणा केली.
महाराष्ट्रातून मुद्रा योजनेचे दिड कोटी लाभार्थी असून त्यात सव्वा कोटी लाभार्थी महिला असल्याचाही मुद्दा त्यांनी नमूद केला. जनधन योजनेतील अनेक लाभार्थी महिला आहेत. जनधन योजनेअंतर्गत 20 कोटींचं वाटप केलं, असंही त्यांनी सांगितलं.