मोदींच्या वाराणसीसह या दोन मतदारसंघात बॅलेट पेपरने मतदान होण्याची शक्यता
नवी दिल्ली : बॅलेट पेपरने (Ballot Paper) निवडणूक घ्यावी ही अनेक विरोधी पक्षांची मागणी आहे. पण निवडणूक आयोगाने सातत्याने यासाठी नकार दिलाय. पण आता अशी वेळ आली आहे, की ज्यामुळे निवडणूक आयोग स्वतःच बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार आहे. तेलंगणा आणि तामिळनाडूतील परिस्थितीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतही हीच परिस्थिती […]
नवी दिल्ली : बॅलेट पेपरने (Ballot Paper) निवडणूक घ्यावी ही अनेक विरोधी पक्षांची मागणी आहे. पण निवडणूक आयोगाने सातत्याने यासाठी नकार दिलाय. पण आता अशी वेळ आली आहे, की ज्यामुळे निवडणूक आयोग स्वतःच बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार आहे. तेलंगणा आणि तामिळनाडूतील परिस्थितीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतही हीच परिस्थिती येऊ शकते.
तेलंगणामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवारी संपली. 170 शेतकऱ्यांसह एकूण 443 उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक 185 उमेदवार निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत, जिथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी निवडणूक लढत आहे.
निजामाबादमध्ये बॅलेट पेपरवर मतदान
द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, तेलंगणातील निजामाबादमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. तेलंगणाचे मुख्य निवडणूक आयुक्त रजत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवर 185 वैध उमेदवार आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल. उमेदवारांची संख्या 64 पेक्षा जास्त असेल, तर निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागते असा नियम आहे.
वाराणसीतही बॅलेट पेपरने निवडणूक?
तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. तामिळनाडूच्या 111 शेतकऱ्यांनीही वाराणसीत मोदींविरोधात निवडणूक लढण्याचं निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी काही दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती. मोदी सरकारवर नाराज असलेल्या या शेतकऱ्यांमुळेही वाराणसीत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागू शकते. कारण, हा आकडा आयोगाच्या 64 या आकड्यापेक्षा मोठा आहे.
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आणि खराब जेवण दिल्याची तक्रार करणारा बीएसएफ जवान तेज बहादूर हे दोघेही मोदींविरोधात निवडणूक लढणार आहेत. शिवाय अपक्ष आणि सपा-बसपा, काँग्रेस यांचाही उमेदवार असेल. त्यामुळे इथेही 64 ची मर्यादा ओलांडल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार का हा प्रश्न आहे.