कोलकात्यात जमलेली ‘महाभेसळ’ संसदेपर्यंत पोहोचणार नाही, मोदींचा हल्लाबोल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनात बोलताना विरोधकांकडून उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेतला. सरकारी संस्था वापरल्याचा आरोप, राफेल डील, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेतला. याशिवाय कोलकात्यात काही दिवसांपूर्वी सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले होते, त्यांचा महाभेसळ असा उल्लेख करत खिल्लीही उडवली. मोदींनी राष्ट्रपतींच्या […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनात बोलताना विरोधकांकडून उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेतला. सरकारी संस्था वापरल्याचा आरोप, राफेल डील, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेतला. याशिवाय कोलकात्यात काही दिवसांपूर्वी सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले होते, त्यांचा महाभेसळ असा उल्लेख करत खिल्लीही उडवली.
मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना संसदेत भाषण केलं. काँग्रेसचे 55 वर्ष आणि एनडीए सरकारचे 55 महिने याची तुलना त्यांनी केली. संपूर्ण बहुमताचं सरकार असेल तर काय करता येऊ शकतं ते आम्ही दाखवून दिलंय. त्यामुळे भेसळीचं सरकार काय असतं आणि बहुमताचं सरकार काय असतं हे जनतेला माहित झाल्याचं ते म्हणाले. शिवाय आता तर महाभेसळ तयार होत आहे, पण ही भेसळ इथपर्यंत पोहोचणार नाही, असा घणाघातही मोदींनी केला.
कोलकात्यात जमलेली महाभेसळ केरळमध्ये एकमेकांचं तोंडही पाहत नाही. यूपीमध्ये महाभेसळीचं राजकारण पाहा, बाहेर करण्यात आलंय. देशाने 30 वर्ष भेसळीचं सरकार पाहिलंय. त्यामुळे देशाला आता हेल्दी लोकशाहीची गरज असल्याचं मोदी म्हणाले.
सरकारी संस्थांवरुन काँग्रेसवर निशाणा
सरकारी संस्थांचा मोदी सरकार वापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यावरही मोदींनी उत्तर दिलं. या देशात स्वातंत्र्यानंतर जवळपास 100 वेळा जनतेने निवडून दिलेली राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली. कलम 356 (राष्ट्रपती राजवट) चा गैरवापर करण्यात आला. इंदिरा गांधींनी 50 वेळा विधानसभा बरखास्त केल्या, देशावर आणीबाणी थोपवली आणि हे सरकारी संस्था वापरल्याचा दावा करतात. मोदीवर बोट उचलण्याआधी काँग्रेसला हे माहित असावं, की उर्वरित चार बोटं त्यांच्याकडेच आहेत, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
“काँग्रेसमध्ये हे दोन टप्पे”
काँग्रेसवर बोलताना मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आपण इतिहासाविषयी बोलतो तेव्हा 1947 ते 2014 या काळाविषयी बोलतो. काँग्रेसमध्ये आमचे मित्र यामध्ये दोन टप्पे पाहतात. त्यातलं एक आहे, BC म्हणजे Before Congress आणि AD म्हणजे After Dynasty, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
“काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 2004 पासून तेच आश्वासन”
जे म्हणतात की हे श्रीमंतांचं सरकार आहे, तर होय, माझ्यासाठी गरीबच श्रीमंत आहेत. गरीबच माझं आयुष्य आहेत आणि त्यांच्यासाठीच मी जगतो. काँग्रेसच्या काळात 55 वर्षांमध्ये स्वच्छतेची आकडेवारी 38 टक्के होती. ती आमच्या 55 महिन्यात 98 टक्के झाली आहे. आम्ही आमच्या कार्यकाळात अधिक वेगाने काम केलंय. काँग्रेसने 2004, 2009 आणि 2014 च्या जाहीरनाम्यात सांगितलं, की आम्ही प्रत्येक घराला वीज देऊ. गरीबी हटाओप्रमाणेच वीज देण्याचंही फक्त आश्वासनच राहिलं, असं मोदी म्हणाले.
“राफेल डील प्रकरणी काँग्रेसवर गंभीर आरोप”
मोदी भाषण देत असताना त्यांना राफेलवर बोलण्याचीही मागणी विरोधकांनी केली. राफेलवर बोलताना मोदींनी काँग्रेसवरच गंभीर आरोप केला. ते म्हणाले, देशात वायूसेना मजबूत होऊ नये ही काँग्रेसची भूमिका आहे. राफेल रद्द करण्याचा प्रयत्न करुन काँग्रेसला कोणत्या कंपनीचं भलं करायचंय? काँग्रेस आणि यूपीए सरकारमध्ये दलालीशिवाय संरक्षण व्यवहार होत नव्हता याचा इतिहासही साक्षीदार आहे, असा घणाघात मोदींनी केला.
“आम्ही गांधीजींचं स्वप्न पूर्ण करतोय”
मोदींनी संसदेत बोलतानाही पुन्हा एकदा काँग्रेसमुक्त भारत या त्यांच्या नाऱ्याविषयी पुनरावृत्ती केली. महात्मा गांधींनी अगोदरच समजलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित करा. मी त्यांचं स्वप्न पूर्ण करतोय. कारण, काँग्रेसमुक्त भारत हे माझं नाही, तर महात्मा गांधीजींचं स्वप्न आहे, असंही मोदी म्हणाले.
बेरोजगारी, शेतकरी समस्या आणि अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची मोदींनी पुन्हा पुनरावृत्ती केली. देशात असंघटित क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय यापूर्वी फसवी कर्जमाफी करण्यात आली. कर्जमाफी आम्हीही देऊ शकलो असतो, पण आम्ही शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांवर पैसा खर्च केलाय. कर्जमाफी केलेल्या कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काय परिस्थिती आहे, ते आपण पाहतोय, असं ते म्हणाले.