बंगालमध्ये मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलं जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी कंबर कसली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये पोहोचले. या सभेला तुफान गर्दी झाली होती. पण मोदींचं भाषण सुरु असतानाच अचानक पळापळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी झाल्या आहेत. यानंतर मोदींनी अवघ्या 14 मिनिटात भाषण आटोपतं घेतलं. पोलिसांच्या […]
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी कंबर कसली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये पोहोचले. या सभेला तुफान गर्दी झाली होती. पण मोदींचं भाषण सुरु असतानाच अचानक पळापळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी झाल्या आहेत. यानंतर मोदींनी अवघ्या 14 मिनिटात भाषण आटोपतं घेतलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, सभेत झालेल्या गोंधळामुळे काही महिला आणि मुलं जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. यापूर्वीही मोदींच्या मिदनापूरमधील सभेत मंडप कोसळला होता. त्यावेळीही काही जण जखमी झाले होते. मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली होती. तर नुकत्यात झालेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीतील वाहनांवर दगडफेकही करण्यात आली होती.
ममता बॅनर्जींवर मोदींचा हल्लाबोल
पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. ममता बॅनर्जी या कम्युनिस्टांच्याच मार्गावर चालत असल्याची टीका मोदींनी केली. पण ममतांना हे माहिती हंव की तेव्हाही लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता आणि आताही होणार नाही, असा इशारा मोदींनी दिला.
मोदींच्या या सभेला तुफान गर्दी जमली होती. केंद्र सरकारने पश्चिम बंगालसाठी गेल्या चार वर्षात 90 हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांसाठीच्या योजना मंजूर केल्या आहेत. पण तृणमूल काँग्रेस सरकारने या योजना लागू केल्या नाहीत. कारण, त्यांना सिंडीकेट पाहिजे, असा टोला मोदींनी लगावला.
जिथे जिथे सिंडीकेटसाठी हिस्सा नसेल, तिथे मलाई मिळत नाही. तिथे टीएमसी विकास योजना राबवण्यास उत्साही नसते, असा घणाघात मोदींनी केला. पश्चिम बंगालमध्ये मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा टीएमसी सरकारने चुराडा केला असल्याचं ते म्हणाले.
महाआघाडीवर मोदींचा निशाणा
केंद्र सरकारने शुक्रवारी सादर केलेलं अंतरिम बजेट हे भाजपच्या सब का साथ, सब का विकास या धोरणाची परिचीती देतं, असं मोदी म्हणाले. एकत्र येत असलेल्या विरोधकांवरही मोदींनी निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी देशातले सर्व विरोधक कोलकात्यात एका व्यासपीठावर आले होते. जे कधी एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते, ते आता एकमेकांच्या गळ्यात पडत आहेत, असा टोला मोदींनी लगावला.