सांगली | 29 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर आहेत. त्यांना आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येणं आपल्या हातात आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर हे साांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं.
प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेतील ईदगाह मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाज आणि मोहल्ला कमिटीची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी आंबेडकर यांच्यासमोर ईव्हीएम मशीनबाबत तक्रार केली. त्यावर इलेक्शन कमिशन आणि सरकार दोघेही ईव्हीएम मशीनच्या तपासणीच्या विरोधात आहेत. त्यामुळे ते बॅलेटपेपरवर मतदान घेत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर होण्यासाठी विविध पर्यायही सांगितले. जनतेतून जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर शासनाला पर्याय उरणार नाही, असं आंबेडकर म्हणाले.
सध्या राजकारणात समझोता चालू आहे. शेवटी राजकारण आहे. काहीही घडू शकते. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आम्ही सध्या जाहीर सभा घेऊ शकतो. केंद्र सरकारचे एक एक धोरण विचारपूर्वक नसल्याचं दिसत आहे. देशातील मुस्लिमांसोबत जसे भाजपा वागत आहे, तसेच दुसऱ्या राष्ट्रांशी वागत आहे. तुम्ही ख्रिश्चनांविरोधात आहात, मग उद्या अमेरिका आणि युरोपबाबत हेच मापदंड लावणार का? केंद्राचं धोरण अपरिपक्व आहे. हे धोरण जातीय व्यवक्थेवर आधारीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत. त्यांनी केंद्र सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये धार्मिकता का आणताय? आमचे नातेवाईक धोक्यात का घालताय? असं विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
राज्यात दंगली घडतील असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दंगली घडवण्याचा अलर्ट पोलिसांना आला की नाही हे प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन विचारा. पोलीस ठाण्यात अलर्ट आला आहे. आधी आयबीला येत होता. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.