पाटणाः मुत्सद्दी राजकारणी, प्रभावी वक्ता आणि योगासनांद्वारे स्वतःला फिट ठेवणारे नेते अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ख्याती आहे. अत्यंत व्यग्र दिनचर्येतही योगाला प्राधान्य देत आरोग्य कसं जपायचं, याचा आदर्श म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, असे नेहमी म्हटले जाते. त्यामुळे याच हक्काने त्यांनी नुकताच त्यांनी बिहारमधल्या (Bihar) एका नेत्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. हे नेते आहेत बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav). बिहार विधानसभा शताब्दी समापनाच्या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांना मोदींनी सल्ला दिला. या कार्यक्रमात तेजस्वी यादल हे लिहून आणलेलं भाषण वाचत होते. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओदेखील बिहारमध्ये तुफ्फान व्हायरल होतोय. बोलताना ते अनेकदा अडखळत होते. पण कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
बिहारमधील हा कार्यक्रम संपल्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी त्यांच्यासोबत येत होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांना हळूच हा सल्ला दिला. मोदी असं काही बोलतील, याची तेजस्वी यादव यांनी कल्पनाही केली नव्हती. स्वतःला योगाद्वारे फिट ठेवणाऱ्या पंतप्रधानांनी तेजस्वी यादव यांनाही वजन कमी करण्याचा सल्ला दिला. हे ऐकून तेजस्वी यादव हसले आणि त्यांच्यासोबत चालू लागले.
बिहार राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव यांना वजन कमी करण्याचा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली.
बिहार विधानसभा शताब्दी समापन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यादव यांचे भाषण सध्या मोठा चर्चेचा विषय ठरले आहे. एरवी ते लिहिलेलं भाषण वाचत नाहीत. मात्र पंतप्रधान उपस्थित असल्याने या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेलं भाषण वाचलं. त्यातही ते अनेक वेळा अडखळले. जनता दल युनायटेडचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी यावर टीका केली. सहानुभूती म्हणून राजकारणात स्थान मिळालं तरीही आत्मविश्वासाची कमतरता दिसून येतेच, अशी टीका त्यांनी केली.