त्या एका घटनेवर मोदी, गांधी यांचे एकमत, लोकशाही आणि राजकारणात हिंसेला…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे आपण चिंतेत असल्याचे ते म्हणाले. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
पेनसिल्व्हेनियामध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्रम्प यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी एक ट्विट करून ट्रम्प यांच्यावरील हल्ला म्हणजे चिंतेची बाब आहे. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे असे म्हटले आहे. तर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध केला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यात एक गोळी त्याच्या कानाला लागून पुढे गेली. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ट्रम्प धोक्याबाहेर आहेत. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीक्रेट सर्व्हिसने तातडीने हल्लेखोरांना ठार केले. या कारवाईनंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसचे आभार मानले. ज्यांनी तत्काळ कारवाई केली. आपल्या देशात अशी घटना घडली यावर विश्वास बसत नाही, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनीही केला निषेध
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल मी अत्यंत चिंतेत आहे. अशा कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. मी त्याच्या जलद आणि पूर्ण पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा देतो असे राहुल गांधी म्हणाले.
या प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही – बिडेन
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. ते सुरक्षित आहे हे जाणून मला आनंद झाला. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि रॅलीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्याबद्दल जिल आणि मी गुप्त सेवांचे आभारी आहोत. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही अहि प्रतिक्रिया दिली.
बिडेन यांनी सुट्ट्या रद्द केल्या
या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आपली सुट्टी रद्द केली. ते व्हाईट हाऊसमध्ये परतले. ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर बिडेन यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिडेन, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन, पीएम मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.