दोन मिनिटांमुळे नरेंद्र मोदी स्वतःचाच विक्रम मोडण्यापासून वंचित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी केलेलं भाषण 92 मिनिटांचं होतं. 2016 मध्ये मोदींनीच 15 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं दीर्घ कालावधीसाठी चाललेलं हे भाषण होतं
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी (Independence Day) भारताच्या पंतप्रधानांनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करण्याची परंपरा आहे. एखाद्या पंतप्रधानाने स्वातंत्र्य दिनी सर्वात दीर्घ काळ भाषण करण्याचा विक्रम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावे जमा आहे. मोदी यंदा आपलाच विक्रम तोडण्याच्या तयारीत होते, मात्र 92 व्या मिनिटाला भाषण आटोपतं घेतल्यामुळे केवळ दोन मिनिटांच्या फरकाने हा विक्रम हुकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जनतेला एक तास 32 मिनिटं म्हणजेच 92 मिनिटं संबोधित केलं. मात्र 2016 मध्ये मोदींनी त्यापेक्षा दोन मिनिटांनी जास्त म्हणजे 94 मिनिटं भाषण केलं होतं. 2017 मध्ये नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी केलेलं सर्वात छोटं भाषण होतं, ते म्हणजे 57 मिनिटांचं.
गेल्या पाच वर्षांत (2014 ते 2018) मोदींनी केलेल्या भाषणांची लांबी सरासरी 77 मिनिटं होती. मात्र यावर्षीचं भाषण लांबल्यामुळे ही सरासरी आता 80 मिनिटांवर (2014 ते 2019) गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणांचा कालावधी
15 ऑगस्ट 2014 – 65 मिनिटं 15 ऑगस्ट 2015 – 88 मिनिटं 15 ऑगस्ट 2016 – 94 मिनिटं 15 ऑगस्ट 2017 – 57 मिनिटं 15 ऑगस्ट 2018 – 80 मिनिटं 15 ऑगस्ट 2019 – 92 मिनिटं
मोदी आणि इतर पंतप्रधानांची तुलनात्मक आकडेवारी
1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी दिलेलं भाषण 72 मिनिटांचं होतं. 2015 पर्यंत ते एखाद्या पंतप्रधानाने स्वातंत्र्य दिनी केलेलं सर्वाधिक लांबीचं संबोधन ठरलं होतं. मात्र 2016 मध्ये त्यापेक्षा 22 मिनिटं अधिक बोलत नरेंद्र मोदींनी नेहरुंचा विक्रम मोडित काढला.
मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानपदी असताना 2004 ते 2013 अशी सलग दहा वर्ष स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषणं दिली. मात्र त्यापैकी एकही भाषण 50 मिनिटांपेक्षा दीर्घ कालावधीचं नव्हतं.
भाजपचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीही सरासरी अर्धा तास भाषण करत असत. 2002 मध्ये त्यांनी अवघ्या 25 मिनिटांचं, तर 2004 मध्ये 30 मिनिटांचं भाषण दिलं होतं.
यंदाच्या भाषणात काय?
नरेंद्र मोदींनी ‘मेरा देश बदल रहा है’ म्हणत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीवरही भाष्य केलं. देशवासियांमधील निराशेचं मळभ दूर झालं आहे. पुढील 5 वर्षात देशवासियांचं स्वप्न पूर्ण करु, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन मोदींनी दिलं.
नरेंद्र मोदींच्या भाषणात कोणत्या मुद्द्यावर किती मिनिटं भाष्य
7 मिनिटं – भारतात गरजांची पूर्ती झाली, आता आकांक्षापूर्ती बाकी 3 मिनिटं – तिहेरी तलाक 9 मिनिटं – कलम 370 1 मिनिट – एक राष्ट्र एक निवडणूक 3 मिनिटं – गरिबी 6 मिनिटं – पेयजल 5 मिनिटं – लोकसंख्या नियंत्रण 2 मिनिटं – घराणेशाही आणि भष्ट्राचार 4 मिनिटं – सुशासन 5 मिनिटं – पायाभूत सुविधांचा विकास 10 मिनिटं – पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था 4 मिनिटं – शांती आणि सुरक्षा 2 मिनिटं – संरक्षण विभाग पुनर्रचना 2 मिनिटं – प्लास्टिकबंदी 2 मिनिटं – मेक इन इंडिया 1 मिनिट – डिजिटल व्यवहार 5 मिनिटं – पर्यटन 2 मिनिटं – खतं आणि रसायनांचं शेतीसाठी कमी वापर 1 मिनिट – चांद्रयान आणि क्रीडापटू
अभूतपूर्व बहुमत मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदींचं लाल किल्यावरचं हे पहिलंच भाषण आहे. माजी पंतप्रधान, भाजपचे दिवंगत अटलबिहारी वाजपेयींनंतर लाल किल्यावरुन सलग सहाव्यांदा भाषण करणारे मोदी हे भाजपचे दुसरे नेते ठरले.