ज्यांचं कोणी नाही, त्यांच्यासाठी सरकार आहे : पंतप्रधान मोदी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत धन्यवाद प्रस्ताव सादर केला. मोदींनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेत भाषण केलं.
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत धन्यवाद प्रस्ताव सादर केला. मोदींनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेत भाषण केलं. एक सशक्त, सुरक्षित राष्ट्राचं स्वप्न अनेक महापुरुषांनी पाहिलं, ते स्वप्न अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे, असं मोदी म्हणाले. ज्यांचं कोणी नाही, अशा सर्वांसाठी सरकार आहे. माझं सरकार गरिबांना समर्पित आहे, असं मोदींनी नमूद केलं.
“आजच्या जागतिक वातावरणात भारताला प्रचंड संधी आहे, त्या संधीचं सोनं करायला हवं. देशासमोरील सर्व आव्हानांचा आपण सामना करु शकतो. या चर्चेदरम्यान जवळपास 60 खासदारांनी भाग घेतला. जे पहिल्यांदाच संसदेत आले आहेत, त्यांनीही उत्तमरित्या आपलं म्हणणं सभागृहात मांडलं. तर अनुभवी खासदारांनी त्यांना प्रोत्साहन दिलं” असं मोदींनी नमूद केलं.
PM Narendra Modi is replying to the ‘Motion Of Thanks On the President’s Address’, in the Lok Sabha. pic.twitter.com/rQy13yoYjq
— ANI (@ANI) June 25, 2019
मोदी म्हणाले, “2014 मध्ये आम्ही पूर्णत: नवे होतो, देशासाठी अपरिचीत होतो. त्या परिस्थितीत एक प्रयोग म्हणून देशाने आम्हाला संधी दिली. मात्र 2019 मध्ये जो जनादेश मिळाला, तो सर्व तराजूमध्ये तोलून, सर्व परीक्षा पास केल्यानंतर मिळाला”
जनतेसाठी झगडणे, काम करणं ही 5 वर्षांची तपस्या होती, त्याचं फळ जनतेने पुन्हा दिलं. कोण हरलं, कोण जिंकलं याचा मी विचार करत नाही. देशवासियांचं स्वप्न आणि त्यांची आशा माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं मोदी म्हणाले.
हीना गावित यांचं कौतुक
यावेळी मोदींनी नव्या खासदारांच्या भाषणाचं कौतुक केलं. मोदी म्हणाले “प्रताप सारंगी, हीना गावित यांनी ज्या पद्धतीने विषय मांडले, त्यानंतर मी काहीहीही बोललो नाही तरी विषय जनतेपर्यंत पोहोचेल. देशातील प्रत्येक महापुरुषाने शेवटच्या माणसाच्या विकासाचा विचार केला. गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात आम्ही तेच ध्यानात ठेवलं”
70 वर्षातील आजार 5 वर्षात कसा बरा होईल?
यावेळी मोदी म्हणाले, देशाला बदलाचं रुप देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. 70 वर्षातील आजार 5 वर्षात बरा करणं खूपच कठीण आहे. मात्र आम्ही दिशा पकडली आहे. अनेक अडथळ्यांनंतरही आम्ही ती दिशा सोडली नाही. आम्ही ना आमचं लक्ष्य सोडलं ना आम्ही त्याचा पाठलाग सोडला.