‘पीएम नरेंद्र मोदी’ निवडणुकीनंतर प्रदर्शित करा : निवडणूक आयोग
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत्या 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट लोकसभा निवडणूक संपल्यानंतर प्रदर्शित होणार आहे. नुकतेच याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासात पार पडणार आहे. असं असताना राजकीय व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट […]
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत्या 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट लोकसभा निवडणूक संपल्यानंतर प्रदर्शित होणार आहे. नुकतेच याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासात पार पडणार आहे. असं असताना राजकीय व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित कसा होऊ शकतो, असा प्रश्न काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारला होता.
त्यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने हा चित्रपट लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर प्रदर्शित करावा असे आदेश चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिला आहे. तसेच निवडणुकांदरम्यान राजकीय नेत्याचे चित्रपटाचे प्रदर्शन होणे हे आचारसंहितेचे भंग होण्यासारखं आहे असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि मनमोहन सिंह यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 5 एप्रिल 2019 ठरवण्यात आली होती. पण त्यानंतर काही कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन 11 एप्रिल रोजी होणार असल्याचे दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं होतं.
देशात 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 11 एप्रिल रोजी देशात निवडणूक पार पडणार आहे. त्यानुसार हा चित्रपट निवडणुकीदरम्यान प्रदर्शित होणार असल्याने विरोधी पक्षांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. तसेच आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी याबाबत मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, निवडणूक आयोगाने या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला होता. या चित्रपटातून आचारसंहितेचे उल्लघंन होत नसल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात दिलं होतं. तसेच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असेही मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले होते. त्यानंतर याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात आली होती.
दरम्यान नुकतचं निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवनावर आधारित आहे. त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना राजकीय नेत्याचे चित्रपटाचे प्रदर्शन होणे हे आचारसंहिता भंग होण्यासारखे आहे. त्यामुळे हा चित्रपट लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर प्रदर्शित करावा असे आदेश चित्रपट दिग्दर्शकांना दिले आहेत.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. या चित्रपटाची टॅगलाईन ‘देशभक्ती ही मेरी शक्ती’ अशी आहे. नरेंद्र मोदींचा बायोपिक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर 23 भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. उमर कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातून मोदी यांच्या एक भाऊ, पुत्र, सेवक, नेता, योगी अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घालणार नाही : निवडणूक आयोग