शेतकऱ्याला ठार मारणार का? लेकीसह ‘मातोश्री’वर आलेल्या चिंताग्रस्त शेतकऱ्याचा पोलिसांना सवाल
कर्जाने अडचणीत आलेला पनवेल जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शाळेय शिक्षण घेणाऱ्या मुलीसह आपली कैफियत मांडण्यासाठी मातोश्रीवर आले (Police action against Farmer with daughter).
मुंबई : कर्जाने अडचणीत आलेला पनवेल जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शाळेय शिक्षण घेणाऱ्या मुलीसह आपली कैफियत मांडण्यासाठी मातोश्रीवर आले (Police action against Farmer with daughter). त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करायची होती. मात्र, मातोश्रीमध्ये प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी संबंधित शेतकऱ्याने पोलीस शेतकऱ्याला ठार मारणार का? असा प्रश्नही उपस्थित केला (Police action against Farmer with daughter).
पनवेलमधील शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मात्र, बराच वेळ होऊनही भेट होत नसल्याने त्यांनी मातोश्रीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवत मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही, असं स्पष्ट केलं. तसेच पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. याला शेतकऱ्याने विरोध केला. अखेर पोलिसांनी मुलीसह शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. संबंधित शेतकऱ्याला चौकशीसाठी खैरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
विशेष म्हणजे पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला माध्यमांसमोर आपली अडचण आणि प्रश्न मांडू देण्यासही मज्जाव केला. यावर संबंधित शेतकऱ्याने पोलीस शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार आहेत का असा सवाल केला. मात्र, पोलिसांनी काहीही न ऐकता त्यांना जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेले. त्यामुळे या शेतकऱ्याची संपूर्ण बाजू समजू शकलेली नाही.
“शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून योग्य ती कारवाई करण्यात येईल. मातोश्री बाहेर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.
मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लेकीसह ताब्यात घेतल्यानंतर नवनियुक्त कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नेहमीच शेतकऱ्यांची चिंता राहिली आहे. शेतकऱ्यांना सुखी ठेवणं हेच मुख्यमंत्र्याचं ध्येय आहे. मुख्यमंत्री लवकरच शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी प्रयत्न करतील.” यावेळी दादा भुसे यांनी शेतकरी प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती केली.