मला अटक करण्यासाठी चाणक्याचे पोलिसांना सतत फोन, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; अंगुलीनिर्देश कुणाकडे?
आव्हाड यांच्या विरोधात लावण्यात आलेली 11 कलमं चुकीची आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात कलम 7 लावलं जात नाही. तरीही हे कलम लावण्यात आलं. त्यामुळे ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा युक्तिवाद कदम यांनी केला.
ठाणे: मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. मला अटक व्हावी म्हणून पोलिसांना चाणक्यांचे वारंवार फोन येत होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयात आणण्यात आलं. त्यावेळी नातेवाईकांशी बोलताना आव्हाड यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून कोणत्या चाणक्याला आव्हाड यांना या प्रकरणात अडकवायचे आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली. नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर आरोप केला.
मी स्वत:हून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो होतो. पण मला खोटं बोलवून अटक करण्यात आली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मला अटक व्हावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते. मला अटक करण्यास सांगितलं जात होतं, असं आव्हाड यांनी म्हटलंय. माझी अटक बेकायदेशीर आहे. अटक करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही. प्रोटोकॉल पाळला गेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आव्हाड यांचे वकील प्रशांत कदम यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.
आव्हाड यांच्या विरोधात लावण्यात आलेली 11 कलमं चुकीची आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात कलम 7 लावलं जात नाही. तरीही हे कलम लावण्यात आलं. त्यामुळे ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा युक्तिवाद कदम यांनी केला.
आव्हाड यांना अटक करताना कोणत्याही नियमांचं पालन केलं गेलं नाही. त्यामुळे त्यांची अटक बेकायदेशीर ठरत असून त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणीही कदम यांनी कोर्टाकडे केली.