नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहीलं आहे. त्यानंतर पोलिसांनी गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात पोलिसांनी सुरक्षेबाबत मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिसांनी गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे.या अहवालानुसार राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नाहीय. या उलट राहुल गांधी यांनीच सुरक्षेच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं. यात त्यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेवर भाष्य केलं.
24 डिसेंबरला भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचली तेव्हा राहुल गांधी यांच्याभोवती गर्दी वाढली. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश आलं, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रेशी संबंधित एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात राहुल गांधी यांच्याभोवती प्रचंड गर्दी आहे.
भारत जोडो यात्रा आता पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यांमधून जाणार आहे. त्यामुळे या यात्रेसाठी सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात यावी. तसंच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. यादरम्यान अनेक लोक राहुल गांधींना भेटण्यासाठी येत असतात. शिवाय अनेकजण या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात. ही यात्रा आता पंजाब आणि जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश करणार असल्याने या यात्रेला जास्तीची सुरक्षा देण्याची विनंती काँग्रेसने केली आहे.