मुंबई : मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रात देखील राजकीय भूकंप होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे (Ramdas Athawle on Maharashtra Politics). महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ते नाराज असून ते लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, असंही आठवले यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे परत आले नाही, तर त्यांचे आमदार भाजपमध्ये येतील, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
रामदास आठवले म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे याचं कुटुंब आधीही भाजपसोबत राहिलं आहे. त्यांच्या आजीने भाजपसोबत काम केलं आहे. त्यांची बहिण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे त्यांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय स्वागत करण्यासारखा आहे. त्यांच्या वडिलांच्या जन्मदिनी त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मोठा क्रांतीकारक निर्णय आहे. मध्यप्रदेशातच नाही, तर संपूर्ण भारतात यामुळे लोकशाही पुरोगामी आघाडी (एनडीए) मजबूत होईल.”
ज्योतिरादित्य शिंदे मराठी चांगलं बोलतात. ते मुळचे महाराष्ट्रातील आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये मोठे बदल होतील. तेथे भाजपचं सरकार येईल. ज्यापद्धतीने मध्य प्रदेशमध्ये बदल होत आहेत, तसे राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही होतील. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपला दुप्पट जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने धोका दिला आहे. मात्र, येथेही बदल होऊ शकतात. महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येऊ शकतं, असं रामदास आठवले म्हणाले.
“उद्धव ठाकरे परत आले नाही, तर त्यांचे आमदार भाजपमध्ये येतील”
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना घेरलं आहे. त्यामुळे ते प्रचंड काळजीत आहेत. त्यांना निर्णय घेताना अडचण होत आहे. मला वाटतं एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे पुन्हा परत येतील. जर ते परत नाही आले, तर त्यांचे अनेक आमदार आमच्यासोबत येतील. त्यामुळे भविष्यात आमचं सरकार येऊ शकेल. मध्यप्रदेश आणि राजस्थानची स्थिती पाहून महाराष्ट्रातील आमदार देखील तसा निर्णय घेतील.
“दोन्ही काँग्रेसवाले उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत”
मध्य प्रदेशात मोठे राजकीय बदल झाले आहेत, राजस्थानमध्ये देखील राजकीय घडामोडी होत आहेत, छत्तीसगडमध्ये देखील असे बदल होऊ शकतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील असे बदल होतील. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसवाले उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत. इतके दिवस त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला आहे. मात्र, आता त्यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणे त्यांना अशक्य दिसत आहे.
संबंधित बातम्या :
नऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची कहाणी
आधी मोदी सरकारवर घणाघात, नंतर मोदी-शाहांची भेट, 14 दिवसात ज्योतिरादित्य शिंदेंचा यूटर्न
ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर आता मध्यप्रदेशात पुढे काय?
Ramdas Athawle on Maharashtra Politics