मुंबईत कबड्डीच्या मैदानात आता राजकीय लढत
मुंबई कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता राजकीय आखाड्याची लढाई पाहायला मिळणार आहे. मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष काँग्रेस आमदार भाई जगताप आहेत.
मुंबई : मुंबई कबड्डी संघटनेच्या (Mumbai Kabaddi association) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता राजकीय आखाड्याची लढाई पाहायला मिळणार आहे. मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष काँग्रेस आमदार भाई जगताप आहेत. पण भाई जगताप यांना नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहीर यांनी आव्हान निर्माण केलं आहे.
मुंबई शहर कबड्डी संघटनेची (Mumbai Kabaddi association) निवडणूक येत्या 25 ऑगस्टला होत आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात शिवसेनेकडून सचिन अहीर मैदानात उतरणार आहेत. अहीर यामध्ये उतरणार असल्याने कबड्डी संघटनेची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
सचिन अहीर आधी राष्ट्रवादीत होते. त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 78 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या मारुती जाधव पॅनेलचं वर्चस्व असून त्यांना कृष्णा तोडणकर पॅनेलनं आव्हान दिलं आहे.
2014-15 च्या निवडणुकीत जाधव पॅनेलनं घाटे पॅनेलचा पराभव केला होता. पण जाधव पॅनेलमध्ये फूट पडल्यानं तोडणकर पॅनेल बनवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार सुनील शिंदे तोडणकर पॅनेलकडून निवडणूक लढण्याची चर्चा सुरु होती. पण आता सचिन अहिर यांचं पँनेल लढणार आहे.
दुसरीकडे मुंबई उपनगर कबड्डी असोसीएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा गजानन कीर्तिकर यांनी दिल्यानंतर कार्यकारी समिती सदस्यांनी अमोल कीर्तिकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड केली. त्यामुळं शहर आणि उपनगर संघटनेवर शिवसेनेचं वर्चस्व आणायचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.