भाजप खासदार आणि आमदारात लेटर वॉर, एकाकडून ब्लॅकमेलरची उपाधी, तर दुसऱ्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप
औरंगाबादमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लेटर वॉर झाल्याचं उघड झालं आहे (Political fighting of BJP leaders).
औरंगाबाद : सत्तेतून बाहेर झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वादही उफाळून येताना दिसत आहेत. जाहीर नाराजीसोबतच आता भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरु झाले. औरंगाबादमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लेटर वॉर झाल्याचं उघड झालं आहे (Political fighting of BJP leaders). यात त्यांनी एकमेकांना अगदी ब्लेकमेलरची उपाधी देत भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी नांदेडमधील काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. यावर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून दखल न घेण्याची विनंती केली.
नांदेड जिल्ह्यात रस्त्यांची कामं प्रगती पथावर आहेत. मात्र ब्लॅकमेलर आमदार प्रशांत बंब यांच्याकडून या कामाची तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब हे अशा तक्रारी करुन ब्लॅकमेलिंगकचं काम करतात. त्यातून विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळा आणला जातो. त्यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या कामांची तक्रार केली आहे. मात्र, तक्रारीअंती ते तडजोड करुन संबंधित ठेकेदाराकडून पैसे वसूल करतात, असा गंभीर आरोप चिखलीकर यांनी बंब यांच्यावर केला आहे.
या पत्रात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विकास कामांच्या विरोधात आमदार प्रशांत बंब यांच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चिखलीकर यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या या पत्राला आमदार प्रशांत बंब यांनी देखील उत्तर देत चिखलीकरांना पत्र पाठवलं आहे.
“मी सक्षम यंत्रणेकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. मी आमदार आहे, पण त्याआधी मी सामान्य नागरिक आहे. जर कुठे काम निकृष्ट होत असेल तर त्याबाबत तक्रार करण्याचा मला अधिकार आहे. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून प्रताप पाटील चिखलीकर राजकारणात आहे असं म्हणत असले, तरी ते निकृष्ट कामाबाबत का बोलत नाहीत? रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत गप्प का?” असे प्रश्न प्रशांत बंब यांनी उपस्थित केले.
“तुम्ही कुठल्या उद्देशाने या उठाठेवी करता हे सर्वांना माहित आहे. प्रशांत बंब यांनी त्यांच्या जिल्ह्यात पाहावं. निकृष्ट काम झालं असेल तर क्वालिटी कंट्रोल टीमने चेक करावं, जर काम निकृष्ट असेल तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं. प्रशांत बंब यांच्या ‘प्रामाणिक हेतूबद्दल’ सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. प्रशांत बंब यांच्या जन्मापूर्वीपासून मी राजकारणात आहे. कामाच्या पद्धती मला माहिती आहे”, असं मत प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना बंब याच्यासमक्षच व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा: