सिद्धरमय्या यांची कहाणी, स्वातंत्र्यापूर्वी जन्म; राजकारणात प्रवेश, एका मुलाला गमावलं
सिद्धरमय्या यांचा जन्म तीन ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते.
बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. २२४ विधानसभेच्या जागांपैकी १३५ जागांवर काँग्रेसने ताबा मिळवला. २०१८ मध्ये १०४ जागा जिंकणारी भाजपा ६६ वर पोहचली. जेडीएसच्या खात्यात १९ जागा मिळाल्या. आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दोन नावं चर्चेत आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे चर्चेत आहेत. आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित होणार आहे.
सिद्धरमय्या यांचा जन्म तीन ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते. आई बोरम्मा गृहिणी होती. दहा वर्षांपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. बीएसस्सी आणि एलएलबी त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून केली. पाच भाऊ-बहिणींमध्ये सिद्धरमय्या हे दुसऱ्या क्रमांकाचे. ते कुरुबा गौडा समाजाचे आहेत. सिद्धरमय्या म्हैसूरचे वकील चिक्काबोरय्याचे ज्युनिअर होते. काही दिवस त्यांनी कायद्याचे शिक्षण दिले.
राजकीय सहभाग
सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला.
सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.
दोन मुलं होते, त्यापैकी एकाचा मृत्यू
सिद्धरमय्या यांच्या पत्नीचे नाव पार्वती आहे. त्यांना दोन मुलं होते. मोठा मुलगा राकेश यांचा २०१६ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी मृत्यू झाला. दुसरा मुलगा यतींद्र २०१८ मध्ये आमदार झाला होता. यावेळी यतींद्र यांना तिकीट मिळाले नाही. सिद्धरमय्या दोन वेळी उपमुख्यमंत्री, तर एक वेळ मुख्यमंत्री राहिले आहेत.