रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत लग्न पत्रिकेद्वारे निवडणूक प्रचार
रत्नागिरीतल्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून प्रचारासाठी थेट लग्न पत्रिकेप्रमाणे पत्रिका (Political wedding card Ratnagiri) छापून शहरात प्रचार सुरु केला आहे.
रत्नागिरी : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी काय शक्कल वापरेल याचा काही नेम नाही. रत्नागिरीतल्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून प्रचारासाठी थेट लग्न पत्रिकेप्रमाणे पत्रिका (Political wedding card Ratnagiri) छापून शहरात प्रचार सुरु केला आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मिलिंद किर उभे आहेत. मिलिंद किर यांनी लग्नपत्रिका (Political wedding card Ratnagiri) छापून प्रचारासाठी वापरलेली पद्धत शहरात सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
रविवार 29 डिसेंबर 2019 रोजी मिलिंद कृष्णकांत किर यांचा शुभविजय करण्याचे योजिले आहे. तरी मंगल प्रसंगी एक नंबरचे अर्थात घड्याळासमोरचे बटण दाबून सोहेबांना विजयासाठी शुभाशीवार्द द्यावेत, असं लग्नपत्रिकेत म्हटलं आहे.
रत्नागिरीतल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून मिलिंद किर उभे आहेत. पण या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी अनोखी कल्पना वापरली. सोशल मीडियावरून लग्नपत्रिकेप्रमाणे वाटणारी ही पत्रिका सध्या चांगलाच भाव खावून जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया असो किंवा घरोघरी प्रचार ही हटके प्रचार यंत्रणा रत्नागिरीकरांना चांगलीच भावते.
मिलिंद किर यांच्या सोशल मीडिया क्लबने ही अनोखी शक्कल वापरली आहे. लग्नपत्रिकेप्रमाणे पत्रिका छापून घेण्यात आली आहे. यात उमेदवाराचा प्रचार आहेच पण मतदारांसाठी मतदानाला सुद्धा प्रवृत्त करण्यासाठी ही पत्रिका उपयोगी ठरत आहे. यामध्ये मतदानाची तारीख, तुम्ही मतदान कुठे करायचं आहे, मतदानाची वेळ आणि माझ्या मामाला मत द्यायला नक्की यायचं हा असं देखील भावनिक आव्हान करण्यात आलं आहे. मिलिंद किर यांच्या सोशल सेलचे प्रमुख श्रीकांत भट यांनी ही अनोखी शक्कल वापरुन लग्नपत्रिकेप्रमाणे पत्रिका तयार केली आहे.
दरम्यान, कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लग्नपत्रिकेचे हे माध्यम मतदारांनाही आवडतेय. निवडणुका म्हटल्या की प्रचार प्रचाराची रणधुमाळी आलीच. पण या हटके प्रचारामुळे रत्नागिरीतल्या मतदारांना एका वेगळ्या प्रचाराची पातळी पहायला आणि अनुभवायला मिळाली.