संजय घाटगेंच्या एबी फॉर्मने कोल्हापुरात भाजपला धक्का, राजे गटात अस्वस्थता
कागलमधून भाजपचे समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी तयारी सुरू असतानाच शिवसेनेनं संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांना एबी फॉर्म दिल्यानं समरजितसिंह राजे गटात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर: शिवसेना-भाजप युतीची (Shivsena BJP Alliance) अधिकृत घोषणा होण्याआधीच रविवारी (29 सप्टेंबर) शिवसेनेने आपल्या संभाव्य उमेदवारांना (Shivsena Candidate List) एबी फॉर्म दिले आहेत. यात कोल्हापुरातील (Kolhapur Politics) 8 विधानसभा मतदारसंघांचा देखील समावेश आहे. त्यापैकी कागल मतदारसंघाची (Kagal Politics) सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू झाली आहे. कागलमधून भाजपचे समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी तयारी सुरू असतानाच शिवसेनेनं संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांना एबी फॉर्म दिल्यानं समरजितसिंह राजे गटात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाल्याने संजय घाटगे गटात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे राजे गटात मात्र निराशा पसरली आहे. भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे असलेल्या 2 जागांची मागणी केली होती. यामध्ये चंदगड आणि कागलच्या जागांचा समावेश होता. विशेषतः कागलच्या जागेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील आग्रही होते.
यामुळे कागलची जागा भाजपला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. त्यामुळेच भाजपकडून इच्छुक असलेले पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील केला. मात्र, याच मतदारसंघातून शिवसेनेचे संजय घाटगे देखील इच्छुक होते.
मागील विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांना केवळ 5 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली होती. म्हणूनच ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला याबाबत कमालीची उत्सुकता होती. त्यातच आज शिवसेनेने या मतदारसंघात संजय घाटगे यांना एबी फॉर्म दिला.
युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच एबी फॉर्म दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. कागलची जागा शिवसेनेच्या ताब्यात राहिली तरी एबी फॉर्म दिल्यानं जागा शिवसेनेला सोडली असं नाही, असाही युक्तीवाद समरजितसिंह गटाकडून केला जात आहे.
कागलची जागा भाजपला जाणार अशी शक्यता असताना आज खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा एबी फॉर्म दिल्याने राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये खळबळ उडाली. या एबी फॉर्म न संभ्रम देखील निर्माण केलाय. या एबी फॉर्मन संजयबाबा गटात उत्साह आला असला तरी राजे गटाची अस्वस्थता मात्र चांगलीच वाढवलीय. आता भाजपकडून इच्छुक असलेले समरजितसिंह घाटगे पुढील काळात काय राजकीय भूमिका घेणार याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.