पुण्यात मतदान अधिकारीच पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यात चक्क मतदान अधिकाऱ्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या, असं आवाहन हा अधिकारी मतदारांना करत होता. पुण्यात शिवाजी मराठा शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार पाहायला मिळाला. मतदान अधिकारी हा मतदात्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत असल्याने, मतदारांनी मतदान केंद्रावर तक्रार केली. हा अधिकारी मतदारांना थांबवून भाजपला मतदान करा, असं सांगत होता. या […]
पुणे : पुण्यात चक्क मतदान अधिकाऱ्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या, असं आवाहन हा अधिकारी मतदारांना करत होता. पुण्यात शिवाजी मराठा शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार पाहायला मिळाला.
मतदान अधिकारी हा मतदात्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत असल्याने, मतदारांनी मतदान केंद्रावर तक्रार केली. हा अधिकारी मतदारांना थांबवून भाजपला मतदान करा, असं सांगत होता. या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी याठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी केली.
संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले असून, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करु, अशी ग्वाही पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
हा खळबळजनक प्रकार पाहून काँग्रेस कर्त्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली.
पुण्यात संथ मतदान
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात अत्यंत धीम्या गतीने मतदान पाहायला मिळालं. संध्याकाळी पाचपर्यंत पुण्यात केवळ 44 टक्के इतकीच मतदानाची नोंद झाली. लोकशाहीच्या या उत्सवात पुणेकरांचा सहभाग तुरळकच असल्याचं यावरुन दिसून येतं.
पुणे लोकसभा निवडणूक
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत. या दोघांमध्ये कोण बाजी मारतं ते 23 मे रोजी निकालावेळी स्पष्ट होईल.