फाईल चोरी करणाऱ्या भाजप नगरसेवकाच्या निलंबनासाठी मुंडन आंदोलन
या प्रकरणामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु या फाईल चोरणाऱ्या नगरसेवकाविरोधात भाजप आणि महापालिकेने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे या नगरसेवकाला निलंबित करण्यासाठी शहरात मुंडन आंदोलन करण्यात आलंय.
ठाणे : गेल्या वर्षी उल्हासनगर महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाईलची चोरी करताना भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु या फाईल चोरणाऱ्या नगरसेवकाविरोधात भाजप आणि महापालिकेने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे या नगरसेवकाला निलंबित करण्यासाठी शहरात मुंडन आंदोलन करण्यात आलंय.
फाईल चोरणारे नगरसेवक महिनाभर तुरुंगवारीही करुन आले आहेत. ते जामिनावर सुटून आल्यावर आपल्या नेत्यांबरोबर उठबस करू लागले. जाहीर सभा संमेलनात मिरवून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय महापालिकेच्या महासभेत भाग घेऊन आयुक्त आणि सभागृहास कायदे आणि नियमांचे धडेही दिले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली जवळीक असल्याचंही या नगरसेवकाने भासवण्याचा प्रयत्न केला. पारदर्शक सरकारचा दावा करणाऱ्या भाजपने या नगरसेवकाला तात्काळ निलंबित करण्यासाठी महापालिकेच्या अधिनियमाच्या कलम 10 च्या तरतुद नुसार त्वरित अपात्र घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथे मुंडन करून भाजपाचा जाहीर निषेध केला. या आंदोलनाला शहरातील अनेक सेवाभावी संस्था, संघटनांनी पाठिंबा दर्शविला.