राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी! येत्या सोमवारी उमेदावारी अर्ज भरणार
Prafulla Patel : सोमवारी म्हणजेच येत्या 30 तारखेला राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटले हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार, हे अखेर स्पष्ट झालंय. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी म्हणजेच येत्या 30 तारखेला राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटले हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्रातील 6 राज्यसभा सदस्यांचा (Rajya Sabha MP) कार्यकाळ संपुष्टात येत असल्यानं त्या जागांवरील निवडणूक आता जाहीर झाली आहे. यानिवडणुकीसाठी 31 मे पर्यंतही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदान पार पडेल. राज्यसभेच्या 6 जागांपैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) खासदार निवडून जातील. यासाठी कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा अखेरचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतशी राजकीय पक्षांकडून उमेदवारीह जाहीर केली जातेय.
कोणत्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपतोय?
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या 6 सदस्यांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यात शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पियुष गोयल, डॉ विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे, काँग्रेसचे पी. चिदंबरम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याच स्पष्ट करण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ :
आता राज्यसभेचं गणित कसं आहे?
या आधीच्या संख्याबळानुसार राज्यसभेवर 3 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 1 जागा शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झालाय.
आता भाजपच्या वाट्याला 2 जागा, तर शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी 1-1 जागा जाईल. त्यातील शिवसेनेच्या दोन्ही उमेदावारांची नावं स्पष्ट झाली असून आता राष्ट्रवादीचाही उमेदवार निश्चित झालाय.