मनोज जरांगे यांच्या ताटात काय मिसळलं जाऊ शकतं?, प्रकाश आंबेडकर यांनी काय केली भीती व्यक्त?
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा कधीही मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच मनोज जरांगे पाटील मुंबईत आपलं भगव वादळ घेऊन मुंबईत धडकणार आहेत. मराठा आरक्षणाचा जाब विचारण्यासाठी मनोज जरांगे पाटील जालन्याहून पायी आले आहेत. थंडी, वाऱ्याची पर्वा नाही, उघड्या माळरानावरच अंग टाकायचं, मिळेल तो भाकर तुकडा खायचा आणि पुन्हा मजल दरमजल करत जायचं, असा लाँगमार्च जरांगे पाटील यांनी काढला आहे.
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी | 25 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांचं वादळ नवी मुंबईच्या वेशीवर येऊ धडकलं आहे. आजचा मुक्काम वाशी मार्केटमध्ये केल्यानंतर हे वादळ मुंबईच्या दिशेने कूच करेल. मुंबईत हे वादळ धडकेल. सरकारला धडकी भरवणारं हे आंदोलन असणार आहे. मनोज जरांगे पाटील एक दिवसासाठी येत नाहीयेत. ते किती दिवस थांबतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा लागणार आहे. या आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्याशी धोकेबाजी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तशी भीती व्यक्त करतानाच मनोज जरांगे
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी शंका व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण नकरता पंगतीत जेवण करावं. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. तर आंबेडकर यांचा सल्ला आपण मानतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मागणी करणारे जग मागतील
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात तोडगा निघेल याबाबत मला शंका आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राजकारणात काहीही होऊ शकतं. सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना चॉकलेट दिलं जात आहे. ते ओळखणारे जरांगे पाटील आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. ओबीसींचे ताट वेगळे आणि गरीब मराठ्यांचे ताट वेगळे ठेवावं. मागणी करणारे अख्खं जग मागू शकतात. पण सरकारने माकडांचा खेळ चालवला आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.
तोडगा काढायला तयार
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मानतो. मी कुठेही खात नाही. माझ्याविरोधात षडयंत्र रचणं त्यांना खूप जड जाईल. आमच्या बैठका आम्ही घेणार आहोत. सर्वांना शांततेतच आवाहन करणार आहोत. आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही तोडगा काढायला तयार आहोत. जे मालक आहेत. त्यांनी तोडगा काढावा. ज्याला विचारावं लागतं त्यांनीच यावं. मालकांनीच चर्चा करायला यावं. निर्णय घेण्याची क्षमता नसणाऱ्यांशी चर्चा करून काय करणार? राज्य कसं हाताळायचं हे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच ठरवावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.