राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे. सुरत कोर्टाने त्यांना काल दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची आज खासदारकी रद्द करण्यात आलीय. पण त्यांच्या विरोधातील या कारवाईवर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जातेय.
पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लोकसभा अध्यक्षांकडून खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केरळ्याच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. पण या कारवाईवर विरोधकांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येतेय. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे, टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे ते अपील करणार आहेत. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
“सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्याविकरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांमध्ये संताप व्यक्त केलाय. आपण काँग्रेससोबत असल्याचं ते ठामपणे म्हणाले आहेत.
“चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचं हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.