एफबीआयच्या मदतीने पुणे पोलीस कामाचे नसल्यावर शिक्कामोर्तब : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे (Prakash Ambedkar in BAMCEF conference).
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे (Prakash Ambedkar in BAMCEF conference). पुणे पोलिसांनी अमेरिकेची तपास संस्था एफबीआयची मदत घेऊन ते स्वतः कामाचे नसल्यावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर औरंगाबाद येथील बामसेफच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन (एनआरसी) केंद्र सरकारवरही टीकेची झोड उठवली (Prakash Ambedkar in BAMCEF conference).
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासात पुणे पोलीस एफबीआयची मदत घेणार आहेत. यातून त्यांनी आपली लोकं कामाची नाहीत यावर शिक्कामोर्तब केला. यासाठी पुणे पोलिसांचं अभिनंदन. एफबीआयची मदत घेण्याच्या प्रकारातून वेळ वाया घातला जाईल. काही लोक अमेरिकेत फिरायला जातील. यातून बाकी काही वेगळं निघणार नाही.” यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी 1 जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जाणार असल्याचंही जाहीर केलं.
नवे कायदे म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था संपवण्याचा प्रकार असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. सीएए कायद्यातून संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे. यातून काही जणांना वगळून आपलं मतदान मजबूत करण्याचा डाव आहे. यातून भटक्या विमुक्त लोकांना फटका बसेल. या कायद्यामुळे आदिवासींना त्रास होईल. धनगर समाजातील मेंढपाळ समुहासोबत इतर अनेक समुहांना याचा त्रास होतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर 40 टक्के लोकांची माहिती मिळू शकणार नाही. त्यामुळं हे सगळे रस्त्यावर येणार आहेत, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बेळगाव प्रश्नावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “बेळगाववरुन आज पुन्हा वाद सुरू आहे. मात्र, बेळगाव महाराष्ट्रात राहील की आणि कर्नाटकात राहील याने मला काहीही फरक पाडत नाही. तो भारतात आहे हे महत्त्वाचं. तिथल्या लोकांचं मत वेगळं आहे. हे मत मी जाणून घेतलं आहे.” यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा 5 वर्षांमध्ये कोरा करावा, अशी मागणी देखील व्यक्त केली.