भाजपाला शिंदेही नकोयत… महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य!
भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या भवितव्याबाबत सूचक इशारा देण्यात आलाय.
मुंबईः भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेसुद्धा (Ekanth Shinde) नको आहेत. जसे त्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नको होते, तसे शिंदेही नकोयत. हे बॅगेजही त्यांना बाहेर काढायचं आहे…. असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या या वक्तव्याने शिंदे गटातील नेत्यांच्या पोटात गोळा येण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. भाजपाच्या मदतीने सत्तादेखील स्थापन केली. हे सगळं एका ‘महाशक्ती’च्या मदतीमुळे घडलं, असं शिंदे गटाचे नेते वारंवार सांगत होते. मात्र हीच महाशक्ती अर्थात भाजप शिंदे गटाला कधीही बाहेरचा रस्ता दाखवू शकते, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यावरच प्रकाश आंबेडकरांनी सूचक वक्तव्य केलंय.
भाजपाला ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंसोबतची युती फायद्याची असेल त्याच ठिकाणी ते सोबत जातील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होते की नाही हे पहावं लागेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पाहा प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
पण शिंदे भाजप युती झाली किंवा नाही झाली… ही गादीची लढाई नाहीये. मतदार राजा आहे. त्या राजाला कुणाला बसवावं वाटतं तो त्या नेत्याला तिथे बसवेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठिंबा देणार, हा प्रश्न विचारला असता, यासंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्याने त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही . तसेच अद्याप आमच्याकडे कुणी पाठिंबा मागितला नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
अंधेरीतील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. त्यासाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे इथं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर त्याविरोधात भाजपचे मुरजी पटेल यांनीही अर्ज भरला आहे. त्यामुळे ही लढत ठाकरे विरुद्ध भाजप अशी थेट होणार आहे.