महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर, वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
आगामी महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोणासोबतही युती करणार नाही, अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. सगळ्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उतरवले जाणार आहेत.
पुणे : वंचित बहुजन आघाडी आगामी महापालिका निवडणुका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ‘वंचित’च्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या संदर्भात माहिती दिली.
वंचितचा स्वबळाचा नारा
आगामी महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोणासोबतही युती करणार नाही, अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. सगळ्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उतरवले जाणार आहेत. त्यानुसार प्रत्येक महापालिका कार्यक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
निवडणुका बहुरंगी होणार
वंचित बहुजन आघाडी आता आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरत असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यासारखे पाच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असताना वंचितच्या उडीमुळे या निवडणुका बहुरंगी होणार आहेत.
वंचितची एमआयएमसोबत फारकत
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वीच त्यांच्यात फूट पडली होती. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान राखला नसल्याचं सांगत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फारकत घेतली होती. एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती, मात्र वंचितकडून आठ जागांची ऑफर होती.
पुढील वर्षी कोणकोणत्या निवडणुका
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यासारख्या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.
महापालिका निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत
दुसरीकडे, मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झाल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
महापालिका निवडणूक 2022 : मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत!
वातावरण राष्ट्रवादीमय, ZP, महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, अजित पवारांचे आदेश