भाजपसोबत जाऊच शकत नाही, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टच सांगितलं; कारणही दिलं
महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांची माझ्याशी चर्चा झाली. त्यावेळी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? ती राहणार असेल तर वंचितचा त्यात कसा समावेश असेल?
मुंबई: भाजपसोबत आमची युती होऊच शकत नाही. त्यांच्यासोबत जे जातील त्यांच्यासोबतही आमची युती होऊ शकत नाही, असं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच महाविकास आघाडीचं अजून काही ठरलेलं नाही. त्यांचं जोपर्यंत काही ठरत नाही, तोपर्यंत आमची त्यांच्यासोबतही युती होऊ शकत नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची राजगृह निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं बंददाराआड चर्चा झाली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपबरोबर युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत. वैदिक हिंदू समाज रचनेबाबतं आमचं भाजपशी भांडण आहे. त्यावर त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. भाजपसोबत कोणी जात असेल तर आम्ही त्यांच्यासोबतही जाणार नाही. मग आमच्याकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय राहत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
येत्या 20 तारखेचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी ठरला होता. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीचं काय करायचं हे त्यांचं ठरत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं काय होईल हे मला दिसत नाही. काँग्रेसची एक टीम येऊन गेली. त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. शिवसेनेसोबत अधिकृत राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेचे काही नेते मला भेटून गेले. पण 20 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त भेटून गेले. त्यात राजकीय चर्चा नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांची माझ्याशी चर्चा झाली. त्यावेळी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? ती राहणार असेल तर वंचितचा त्यात कसा समावेश असेल? त्याचा आराखडा तयार आहे का? असा सवाल मी त्यावेळी केला होता, असं ते म्हणाले.
तसेच नाना पटोले सातत्याने काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं सांगत आहेत. त्यावेळी तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की वंचित आघाडीसोबत तुम्ही एक एक स्वतंत्रपणे बोलणार आहात का ते स्पष्ट करावं, असं मी त्यांना म्हटलं होतं.
पण अजूनपर्यंत महाविकास आघाडीकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यांचा प्रस्ताव येत नसेल तर मग आम्हाला वेगळं गेल्या शिवाय मार्ग नाही. त्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.