हातात सत्ता द्या, दोन दिवसासाठी मोहन भागवतांना जेलमध्ये घालतो : प्रकाश आंबेडकर
कोणाकडे जर बंदूक सापडली, तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग मोहन भागवतांकडेही शस्त्र असतात. तर त्यांना मोकळीक कशासाठी? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला
औरंगाबाद : माझ्या हातात सत्ता द्या, दोन दिवसासाठी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना जेलमध्ये घालतो, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. शस्त्र बाळगूनही भागवत यांना मोकळीक दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोणाकडे जर बंदूक सापडली, तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग मोहन भागवतांकडेही शस्त्र असतात. तर त्यांना मोकळीक कशासाठी? कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर मला सत्ता दिलीत, तर मी मोहन भागवत यांना दोन दिवसासाठी जेलमध्ये घालेन, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. औरंगबादमध्ये मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यापूर्वीही प्रकाश आंबेडकर आणि मोहन भागवत यांच्यात शाब्दिक वाद उफाळला होता. ‘वाघ एकटा असेल, तर जंगली कुत्रे आक्रमण करुन त्याला संपवणारच. आपल्याला हे विसरता कामा नये’ असं मोहन भागवत अमेरिकेत विश्व हिंदू काँग्रेसच्या परिषदेत म्हणाले होते. देशातील विरोधीपक्षांना कुत्रा संबोधल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी भागवतांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.