हे सरकार लुटारूंचं, भाजपची लुटीत वाट्यासाठी वाटचाल, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा
वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम नाही. उत्तर प्रदेशसह भाजप चार राज्यात निवडून आले आहे. तिथे काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का? , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम नाही. उत्तर प्रदेशसह भाजप चार राज्यात निवडून आले आहे. तिथे काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का? , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सध्या राज्यामध्ये विरोधक एकमेकावर चिखलफेक करत आहेत. जे राजकीय नेते निवडून येत आहेत ते स्वार्थासाठी येत आहेत. जनतेच्या सेवेसाठी ते येत नाहीत, अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सरकारनं ओबीसी आरक्षण ही दिलं नाही. यामुळं कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराचा निश्चित विजय होईल व विधानसभेमध्ये आमचा आमदार जाईल, असं आंबेडकर म्हणाले. कोल्हापूरच्या जनतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, असंही ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकार लुटारुंचं
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार लुटारूंचे असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत केला आहे. बजेट मधून किती लुटता येईल याची आकडेवारी बाहेर येते आणि त्या लूटीमध्ये आपला वाटा असला पाहिजे त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू असल्याचं ही त्यांनी म्हटलंय. तर या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर एक दोन कोटी खर्च होतील असं वाटत नाही. निवडणुकीत पंचवीस पंचवीस तीस कोटी खर्च होऊ शकतो. त्याच्या विरोधात आपण लढत आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
आमच्यावर ईडीची कारवाई होत नाही
आम्ही देखील इतरांएवढी वर्ष आम्ही राजकारणात आहोत, तरी ईडी ची कारवाई आमच्यावर का होत नाही असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. राजकारण हे कमवण्यासाठी आहे असं मी कधीही मानत नाही. राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ओबीसीसाठी काय केलं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विचारा
दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी अग्रेसर असून आता नुसती रस्त्यावरची लढाई करून उपयोगाची नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे ओबीसी मंत्री प्रचाराला येतील त्या वेळेस त्यांना कॅबिनेटमध्ये ओबीसी आरक्षणा बाबत काय केलं याचा खुलासा मागावा. जर सकारात्मक चर्चा होत नसेल तर मंत्रिमंडळाचा राजीनामा आपण का देत नाही, असा सवाल त्यांना विचारा असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या: