अकोला : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी (25 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली आहे (Prakash Ambedkar slams NCP and Congress).
“शेतकऱ्यांचं आंदोलन हे नुसतं शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून नाही तर या देशाच्या फोर्स सेक्युरिटीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनाने दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसाच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. मी पूर्णपणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोष देत नाही. ते दोषी आहेतच, पण याची सुरुवात 2006 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कायदा करुन याची सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उत्तर द्यावं, तुमची नौटंकी कशासाठी चालू आहे?”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“एका बाजूला केंद्राने तुमचाच कायदा आणला. तुमचीच भूमिका केंद्र राबवत आहे. मग तुम्ही आरएसएस आणि भाजपची बी टीम नाही का? आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना? तुम्ही महाराष्ट्रातील कायदा रद्द का करत नाही? याचा अर्थ भाजपने आणलेल्या केंद्राच्या कायद्याला तुमचा विरोध नाही. फक्त नौटंकी आणि तमाशा म्हणून तुम्ही विरोध करत आहात. लोकांनी शेतकऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या पक्षाच्या बाजूने राहावे. जातीच्या नावाने राहिलात तर इथला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय दारिद्र्य रेषेखालील जगणारा माणूसही उद्ध्वस्त होईल, याची दक्षता घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली (Prakash Ambedkar slams NCP and Congress).
शेतकरी आंदोलनावर शरद पवार आणि संजय राऊत काय म्हणाले?
“पंजाब-हरियाणा देशाचा अन्नदाता आहे. न दुखावता मार्ग काढायला हवा होता. ज्या पद्धतीने येण्या जाण्यासाठी काही परवानग्या द्यायला हव्या होत्या. पण जाचक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे प्रतिकार झाला. संयम आणि 60 दिवसांचं आंदोलन पाहून ही परिस्थिती हाताळायला हवी होती. पण ते न केल्याने वातावरण चिघळलं. जे घडतंय त्याचं समर्थन नाही, पण ते का घडतंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती,” असं शरद पवारांनी सांगितले.
“केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. रास्त प्रश्नासंबंधित ज्या मागण्या असतील त्याला अनुकूल निर्णय घ्यावा. बळाचा वापर करून काही निर्णय घेतला. एकेकाळी अस्वस्थ पंजाब पाहिला आहे. तो सावरला आहे. त्या पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचा पातक मोदी सरकारने करू नये हे आवाहन आहे,” असंही पवार म्हणाले.
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
“राष्ट्रीय शरमेची ही बाब आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला. दोन महिन्यापासून शांततेने आंदोलन सुरु होतं. जगभरात त्याचं कौतुक होतं. शेतकऱ्यांचं इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कुठे झालं नाही. आज अचानक काय झालं? शेतकऱ्यां चा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का? शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटणार होता, तर ती सरकारचीही जबाबदारी होती”, असा घणाघात संजय राऊत यांनी केली.
संबंधित बातम्या :
खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Delhi Tractor rally : जवळपास 200 कलाकार आणि मुलं ‘लाल किल्ल्या’जवळून रेस्क्यू!