Delhi Tractor rally : जवळपास 200 कलाकार आणि मुलं ‘लाल किल्ल्या’जवळून रेस्क्यू!
शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या हिंसक वळणामुळे जवळपास 200 कलाकार आणि लहान मुलं लाल किल्ला परिसरातच अडकून पडली होती. आता त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राजपथावर सैन्य परेड आणि विविध राज्यांच्या चित्ररथांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कलाकारांनी आपल्या कलेतून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यासह देशभरातील लहान मुलांचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या हिंसक वळणामुळे जवळपास 200 कलाकार आणि लहान मुलं लाल किल्ला परिसरातच अडकून पडली होती. आता त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.(Police release artists and children trapped in Lal Killa area due to farmers’ agitation)
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेणारे कलाकार आणि लहान मुलं लाल किल्ला परिसरातच अडकून पडले होते. आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसेमुळे हे लोक तिथून बाहेर पडू शकत नव्हते. दुपारी 12 वाजल्यापासून हे कलाकार आणि मुलं तिथेच अडकून पडले होते. पोलिसांनी आता त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. या कलाकारांसह शौर्य पुरस्कार मिळालेले लहान मुलंही होती.
सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
रेस्क्यू केलेले कलाकार आणि शौर्य पुरस्कार प्राप्त मुलांना दरियागंजपासून राष्ट्रीय रंगशाळा कँप आणि धौला कुलापर्यंत सुरक्षित सोडलं आहे. सर्व लोकांना दिल्ली पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहन आणि सीआरपीएफच्या बसमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पोलिसांनी सुटका केल्यानंतर सर्व कलाकार आणि लहान मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ट्रॅक्टर रॅली संपली पण आंदोलन सुरुच राहणार
संयुक्त किसान मोर्चाकडून किसान प्रजासत्ताक परेडची सांगता, सर्व आंदोलकांना आपआपल्या आंदोलनस्थळी परतण्याचे निर्देश, कृषी कायद्याविरोधात शांततेत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार, आंदोलनाची पुढील दिशा चर्चेनंतर ठरवणार आहेत.
Samyukt Kisan Morcha (SKM) has called off Kisan Republic Day Parade with immediate effect &appealed to all participants to immediately return to their respective protest sites. SKM announced the movement will continue peacefully& further steps will be discussed & decided soon:SKM
— ANI (@ANI) January 26, 2021
शेतकऱ्याचा मृत्यू
दरम्यान, ही हिंसा सुरू असतानाच एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय. नवनीत सिंह असं या मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे. तो 30 वर्षाचा असून उत्तराखंडचा रहिवासी आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
दरम्यान, दिल्लीतील हिंसक आंदोलनाची केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, क्राईम ब्रँच आणि तिन्ही झोनच्या स्पेशल पोलीस आयुक्तांची आज बैठक पार पडली. त्यात राजधानी दिल्लीत ज्या ज्या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आमि ड्रोन फुटेज सीज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Tractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू
Police release artists and children trapped in Lal Killa area due to farmers’ agitation