Prakash Ambedkar : सुजात आंबेडकरची राजकारणात एन्ट्री? वडील प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं
सुजात आंबेडकर यांची सक्रीय राजकारणात एन्ट्री झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सुजात आधी शिक्षण पूर्ण करेल, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.
अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिलंय. भोंगे हटवले गेले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेत. अशावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरजार टीका केली. इतकंच नाही तर त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणण्यांच आव्हानही दिलं होतं. त्यामुळे सुजात आंबेडकर यांची सक्रीय राजकारणात एन्ट्री झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सुजात आधी शिक्षण पूर्ण करेल, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.
सुजात आंबेडकरच्या राजकीय प्रवासाबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सुजातने एमएससी केलं आहे. त्याला अजून शिकायचं आहे. शिक्षणासाठी तो बाहेर जातोय. तो आता पूर्णवेळ शिकायला जाणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत त्याने मांडलेल्या भूमिकेबाबत मी इतकंच सांगेन की, पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिलं. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्याने राजकारणात यायचं नाही हे मी त्याला सांगितलं आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं.
‘आम्ही शिवसेना, काँग्रेससोबत लग्नाला तयार’
अकोल्यात आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी युती संदर्भात एक वक्तव्य केलंय. ते बोलले की, आम्ही शिवसेनेची युती करण्यात तयार आहोत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा भेटीसाठी बोलवलंही होतं. मात्र त्यांची काही हिम्मत झाली नाही मला काही बोलायची. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस समोरही प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं की युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत. मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्यासोबत फिरायला तयार आहेत. मात्र लग्नाला तयार नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
शिवसेना, काँग्रेसची वाट पाहतोय
याआधीही मी प्रस्ताव दिले आहेत. हा काही नवीन प्रस्ताव नाही. शिवसेनेची वाट बघतोय. काँग्रेसची वाट बघतोय. ते म्हणतात, फिरा आमच्याबरोबर. चांगले संबंध चांगले आहेत. चांगली ओळख आहे. आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो. बाळासाहेब ठाकरेंशी माझे संबंध चांगले होते. पण, त्यांची ठरवायचं की, लग्न करायचं की नाही. ते दोस्तीच करायला मागतात. त्याच्या पुढं जायला तयार नाहीत, असंही प्रकाश आंबेडकर मिश्कीलपणे म्हणाले.
इतर बातम्या :