सुप्रिया सुळेंचा पराभव होणार नाही : प्रकाश आंबेडकर
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं लोकांनी याचा विचार करावा आणि मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवू नये. भाजपचे खासदार निवडून येणार नाही याची दक्षता घ्यावी”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुण्यात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन […]
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं लोकांनी याचा विचार करावा आणि मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवू नये. भाजपचे खासदार निवडून येणार नाही याची दक्षता घ्यावी”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पुण्यात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असली तरी सुप्रिया सुळेंचा पराभव होणार नाही, असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि दुष्काळावरुन आघाडी आणि युतीला धारेवर धरलं.
सुप्रियांचा पराभव होणार नाही
शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी चोरुन विकास केला आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे पडणं अवघड असल्याचं आंबेडकर म्हणाले.
भाजपला बहुमत मिळणार नाही या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला. प्रादेशिक पक्षांच्या आतित्वाला धक्का लावणार नाही, अशा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचं नाव पुढं करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘ईव्हीएम हॅक होऊ शकतं’ यावेळी बोलताना त्यांनी ईव्हीएम मशीन ही इलेक्ट्रॉनिक असून हॅक होऊ शकते. जगात आणि देशात अनेक ठिकाणी हॅकिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं निवडणूक आयोग आणि न्यायालय कोणत्या आधारावर बोलत आहे, असा सवाल आंबेडकर यांनी केला. आयोग आणि कोर्टाने याचं स्पष्टीकरण द्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपनं याचा उपयोग करुन घेतला आणि आता भाजपच्या नावानं ओरडत आहेत, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.
निवडणूक आयोगाला कोणता अधिकार?
निवडणूक आयोगाला नेमका कोणता अधिकार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. राजकीय पक्षांनी कोणत्या मुद्यावर बोलावं याबाबत आयोगाला अधिकार नाही. राजकीय पक्षांना त्यांचा अजेंडा आहे. निवडणुकीनंतर आचारसंहिता शिथील करण्यासाठी आयोगाकड जावं लागतं. निवडणुकीनंतर दुष्काळासाठी आचारसंहिता संपायला हवी, असं आंबेडकर म्हणाले.
50 वर्षात पाण्याचं नियोजन का नाही?
दुष्काळी दौरा मी पण केला असून पुन्हा दौऱ्यावर जाणार आहे. मात्र मी याचं मार्केटिंग करत नाही. मेलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी खाण्याची सवय नाही, असा टोला त्यांनी आघाडी आणि युतीला लगावला. पन्नास वर्षे आघाडीची सत्ता होती आणि आता युतीची सत्ता आहे. मात्र सर्वांनी जबाबदारी टाळून मतदारसंघात पाण्याची पळवापळवी केली. अवर्षण भागात पाण्याचं नियोजन गरजेचं आहे. पन्नास वर्षे सत्ता भोगली आणि आता चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
गडचिरोली हल्ला
प्रकाश आंबेडकर यांनी गडचिरोलीतील नक्षल हल्ल्याबाबतही भाष्य केलं. “हा कायदा सुव्यवस्थे प्रश्न नाही तर तो निर्माण करण्यात आला आहे. मुळात प्रश्न मिटला पाहिजे हा प्रयत्न दिसत नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.