मुंबई : माजी राज्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश मेहता विधानसभा निवडणुकीत डावललं गेल्याने नाराज आहेत (Prakash Mehta on leaving BJP). ही नाराजी अजूनही कायम आहे की काय असा प्रश्न आहे. मेहता यांनी आपली नाराजी अगदी पक्षश्रेष्ठींना देखील कळवली होती. सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे प्रकाश मेहता भाजप सोडणार का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत (Prakash Mehta on leaving BJP).
प्रकाश मेहता यांना भाजप सोडणार का हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “काही प्रश्न असतात, मी नाराज नाही, मी माझी भूमिका पक्षाला कळवली आहे. पक्षश्रेष्ठींना येथील प्रश्नांची कल्पना दिली आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा देखील केली आहे. चर्चेने प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे लवकरच हे प्रश्न सुटतील, अशी मला अपेक्षा आहे.”
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचंही ते म्हणाले. जे भाजपचं बाळकडू प्यायले आहेत, ते वेगळा विचार करणार नाहीत, असं मेहतांनी म्हटलं.
लोकसभा आणि विधानसभेची अधिवेशन सुरु आहेत. त्यापूर्वी निश्चितपणे आम्हाला चर्चा करण्यास आणि पक्षासोबत अधिक गतीने काम करण्यास संधी मिळेल, असा विश्वास आहे. भाजप सोडण्याचा विचार नाही, तसा विचार मी कुठेही मांडलेला नाही. मी कोणताही निर्णय घेणार नाही, असं प्रकाश मेहतांनी सांगितलं.
विशेष म्हणजे प्रकाश मेहता 12 डिसेंबर रोजी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडेदेखील नाराज असल्याची चर्चा आहे. मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे विधानपरिषेदच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यातच पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या समर्थकांना पुढील प्रवासाविषयी काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे देखील नाराज असून त्या राजकीय प्रवासाबद्दल धक्का देणारा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशास्थितीत प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांची जवळीक चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
VIDEO :