मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार जाऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात नवं सरकार आलंय. तेव्हापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि जोरदार टीका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी रविवारी दहिसरमधील एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. सुर्वे यांच्या वक्तव्याची एक व्हिडीओ क्लिपही शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी पोलिसांकडे दिलीय.
‘आपण गाफील राहायचं नाही. पण यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय अपण गप्प बसायचं नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी अरे केलं तर त्याला कारे करा, प्रकाश सुर्वे इथं बसलाय. ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो मी, चिंता करु नका. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण अंगावर आला तर शिंगावर घेऊन कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवून राहा’, असं वक्तव्य असलेली आमदार प्रकाश सुर्वे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप दहिसर पोलीस ठाण्यात देत शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय.
दहिसर कोकणीपाडा बुद्धविहार परिसरात रविवारी प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश सुर्वे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप आहे. आज लोकशाही प्रधान देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर देशाच्या संविधानाचे, लोकशाहीचे विश्वस्त समजले जाणारे आमदारच जर अशी प्रक्षोभक भाषणे करुन तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही गुन्हे गारी करा, मी तुम्हाला सोडून आणेन, असे बोलून लोकशाहीची थट्टा करणार असतील, प्रभागात जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या लोकांना देणार असतील तर हे अतिशय लज्जास्पद आणि संतापजनक आहे, असं उदेश पाटेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.