बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे; प्रवीण दरेकर यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pranin Darekar) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जे आम्हाला सोडून गेले ते कधी आमचे नव्हतेच तर त्यांचा काय विचार करायचा आहे. आता जे आमच्यासोबत येत आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं पेडणेकर यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा ते नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे, त्याच्याशी चर्चा करायचे पण आता अंहकार आडवा येत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
दरेकर यांनी नेमकं काय म्हटलं?
भाजप नेते दरेकर यांनी किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्याच्या शिवसेनेत हाच तर प्रॉब्लेम आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची अपुलकीनं चौकशी करायचे, मायेन त्याच्या पाठिवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
54 आमदारांपैकी 40 आमदार सोडून गेले
मात्र आता जे सोडून गेले ते लोक यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. 54 आमदारांपैकी 40 आमदार सोडून गेलेत, ते आमदार यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. कारण अंहकार आडवा येतो. यांनी काँग्रेस , राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. आता ते भारत जोडो यांत्रेला देखील उपस्थित राहणार आहेत, असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.