प्रणिती शिंदे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, सोलापूरमध्ये विरोधकांनी घेरलं
आमदार प्रणिती शिंदे 2009 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जाई जुईच्या माध्यमातून केली. माकपाचे तत्कालिन आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय कारकिर्दीची ओपनिंग केली.
सोलापूर : सोलापूरची राजकारणात खरी ओळख आहे ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यामुळे. लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला, त्यात सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून 31 हजाराची पिछाडी मिळाली. याच मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) करतात. त्यामुळे मागील दोन निवडणुका पाहता शिंदे कुटुंबियाच्या वोटबँकेला ओहोटी लागेलेली दिसते. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासमोर आपल्या बुडत्या जहाजाला वाचविण्याचे मोठे आव्हान आहे.
आमदार प्रणिती शिंदे 2009 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जाई जुईच्या माध्यमातून केली. माकपाचे तत्कालिन आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय कारकिर्दीची ओपनिंग केली. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि शिवसेनच्या उमेदवारांना धूळ चारून विजय मिळवला.
शहर मध्य मतदारसंघ हा मुस्लिमबहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जवळ-जवळ १ लाख मतदार मुस्लिम समाजातील आहे. त्याखालोखाल दलित, तेलगु भाषिक समाजाचाही मोठ्या प्रमाणावर या विधानसभा मतदानसंघात संख्या आहे.
विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार याच मतदारसंघात वास्तव्यास आहेत. कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता आणि त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून हक्काची घरे मिळवून देण्याच्या भूमिकेमुळे कामगारांनी माकपच्या नरसय्या आडम यांच्या सीपीआयएमला देखील या मतदार संघातून संधी दिली होती.
मात्र 2009 मध्ये नरसय्या आडम यांचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसला नवं नेतृत्व सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून दिलं.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खरी लढत झाली ती एमआयएम आणि काँग्रेसमध्येच. एकेकाळी काँग्रेसचे नगरसेवक असलेले तौफीक शेख यांनी ऐन विधानसभा निवडणुकीवेळी एमआयएममध्ये प्रवेश केला. मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएमचे तौफीक शेख यांनी प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज दिली. म्हणूनच की काय निकालानंतर प्रणिती शिंदे यांच्या विजयापेक्षा तौफीक शेख यांच्या पराभवाची चर्चा अधिक झाली.
मात्र आता पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे मतदारसंघातील स्थिती आता हळूहळू बदलताना दिसत आहे.
2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
प्रणिती शिंदे, काँग्रेस – 46907
तौफिक शेख, एमआयएम – 37138
महेश कोठे, शिवसेना – 33334
मोहिनी पत्की, भाजप – 23319
गेल्या निवडणुकीत एमआयएमचे एमआयएमचे तौफिक शेख 37 हजार मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. यंदाच्या विधानसभेत एमआयएमसोबत प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएमच्या तौफिक शेख यांच्याकडे मतदारसंघातील लोकांचं झुकतं माप दिसत होतं.
मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर तौफीक शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने ते सध्या तुरुंगात हवा खात आहेत. 2014 च्या विभानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या नाकी नऊ आणणारे तौफिक शेख सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांचे थोडेसे विघ्न कमी झालेले असताना स्वकीयांनीच बंडाचा झेंडा उगराला आहे. काँग्रसचे माजी महापौर यू एन बेरिया यांनी काँग्रेसने अनेक वेळा मागणी करुनही मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही, यंदाच्या वेळेस काँग्रेसने मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली आहे.
स्वपक्ष्यातल्या लोकांनी बंडाची भाषा केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तर मुस्लिम बहुल मतदारसंघावर डोळा ठेऊन गत विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघातून मनसेतर्फे निवडणूक लढविलेल्या फारूक शाब्दी यांना एमआयएमने उमेदवारी दिली आहे. मुस्लिम समाजातील स्वच्छ चेहरा आणि गतवर्षीच्या मुस्लिम मताचा आकडा पाहता यंदा एमआयएम इथे करिष्मा करेल अशी आशा एमआयएमच्या नेत्यांना आहे.
शिवसेनेचे आव्हान
एकीकडे एमआयएमचे तगडे आव्हान असताना, दुसरीकडे सध्या राज्यात भाजपा बरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेचे नेते महेश कोठेंनी सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रणिती शिंदे आणि महेश कोठे यांच्यात विस्तव जात नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांनाही 33 हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि यंदाच्या विधानसभेत भाजप-सेना युती झाल्यास भाजप-सेनेचा उमेदवारही जेतेपदाची मतं मिळवू शकतो. महेश कोठे यांच्याशिवाय काँग्रेसला राजीनामा देऊन शिवसेनेत आलेले दिलीप मानेही शहर मध्यमधून इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना या जागेवर ताबा घेईल असं राजकीय अभ्यासकांना वाटतं.
एमआयएम,शिवसेना आणि काँग्रेस पक्षातीलच स्वकीय हे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा रथ अडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यातच माकपच्या नरसय्या आडम यांनी सुद्धा मागील दोन निवडणुकीच्या पराभवाचा काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या विडी कामगारांच्या माध्यमातून काम सुरु केलं आहे. शिवाय भाजप-शिवसेना युतीचं तगडं आव्हान असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर अडथळ्यांची मोठी शर्यत आहे.