मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त ववक्तव्यावरून राज्यभर पडसाद उमटत असतानाच भाजप नेते प्रसाद लाड यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी म्हटलं आहे.
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.
राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान केलं. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या!”, असं ट्विट राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. त्यानंतर कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणीसाठी राज्यभर निदर्शनं केली जात आहेत. अशातच एकामागोमाग एका भाजप नेत्याकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर आता प्रसाद लाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. लाड यांनी क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्राची माफी मागायला हवी, अशी मागणी होत आहे.