प्रशांत गडाख दु:खाचं गाठोडं कसं फेकणार? राजकारणात उतरणार?

| Updated on: Jan 01, 2021 | 7:11 PM

'आता काळच ठरवेल की, मी राजकारणात (Politics) यायचं कि नाही.' प्रशांत गडाखांचे फेसबूक पोस्टमधून संकेत

प्रशांत गडाख दु:खाचं गाठोडं कसं फेकणार? राजकारणात उतरणार?
Follow us on

अहमदनगर: 2001 साली अहमदनगरच्या सोनईत (Sonai Ahmednagar) एक सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. अनेक जोडपी विवाहबद्ध झाली, आणि आपल्या संसाराची त्यांनी सुरुवात केली. यातीलच एक जोडपं होत, प्रशांत आणि गौरी गडाख. (Prashant Gadakh and Gauri Gadakh) सुखी जीवनाची या दोघांनीही स्वप्न रंगवली. गौरी ही विखे (Vikhe Patil) पाटलांच्या कुटुंबातील..तर गडाखांचाही जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलाच दबदबा. ही 2 राजकीय कुटुंब एकत्र आली. आजच्या अनेक राजकीय विवाहांप्रमाणं हाही विवाह अतिशय आलिशान, महागडा करता आला असता, पण समाजासाठी नेहमी झटणाऱ्या प्रशांत गडाखांना ते पटलं नाही, आणि आपल्या विवाहाच्या खर्चात इतरांचीही आयुष्य सुरु झाली पाहिजे हा निर्णय त्यांनी घेतला.(Prashant Gadakh’s Facebook post after the suicide of his wife Gauri Gadakh)

 

18 मे 2001 ला, प्रशांत आणि गौरी गडाख विवाहबद्ध झाले, त्यावेळीचे क्षण

“मानपान हा नकोच, नकोच देणी घेणी,
परिवर्तनाचा बीजमंत्र हा, नवयुगाची वाणी”

विवाह सोहळ्याच्या मंचावरील हे वाक्य, प्रशांत आणि गौरीच्या आयुष्याचं ब्रीद ठरलं… राजकारणात न येता गौरी आणि प्रशांत यांनी आपली सामाजिक चळवळ सुरुच ठेवली..

अगदी साधेपणानं प्रशांत आणि गौरी यांचा विवाह पार पडला, यावेळी अनेक जोडप्यांचीही आयुष्याची सुरुवात केली

प्रशांत गडाखांनी राबवलेले विविध उपक्रम

01. प्रशांत गडाख हे शिक्षण संस्था सांभाळतात, त्यात विविध उपक्रम त्यांनी नेहमीच राबवले

02. गडाख कुटुंबानं नेहमीच साहित्य जोपासलं, आणि त्यातूनच गाव तिथं वाचनालय ही संकल्पना त्यांनी सुरु केली

03. वृक्षारोपणासाठी प्रशांत गडाखांनी मोठे प्रयत्न केले, जन्मदिवशी एक वृक्षाची लागवड हा संकल्प त्यांनी मांडला

04. गौरी गडाखांनाही वाचनाची विशेष आवड होती, मतदार संघातील विविध कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग होता

प्रशांत आणि गौरी गडाखांचं ते भन्नाट नृत्य

ज्ञानेश्वर कॉलेज, सोनईमध्ये 30 जानेवारी 2020 च्या ‘यशोरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातील क्षण

प्रशांत गडाख आणि गौरी यांचा संसार सुखाने सुरु होता. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत दिसायचे. शिक्षण संस्थेतील संमेलनातही प्रशांत आणि गौरी सामील झाले. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थी आपले कलागुण दाखवित होते. त्याचवेळी संस्थेचे अध्यक्ष असलेले प्रशांत गडाख पत्नी गौरीसह मंचावर आले.

गौरी गडाखांसोबत प्रशांत गडाख यांनी ठेका धरला

ज्ञानेश्वर कॉलेज, सोनईमध्ये 30 जानेवारी 2020 च्या ‘यशोरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातील क्षण

विद्यार्थ्यांनी प्रशांत गडाखांना नृत्य करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या रंग बरसे भिगी चुनरवाली या गाण्यावर ठेक धरला. पत्नी गौरीनंही त्यांना नृत्यात साथ दिली.

प्रशांत गडाख आणि गौरी गडाख यांच्या नृत्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

ज्ञानेश्वर कॉलेज, सोनईमध्ये 30 जानेवारी 2020 च्या ‘यशोरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातील क्षण

पण मंचावर आनंदात नाचणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात काहीच दिवसांत काळोख पसरणार असल्याची कल्पनाही कुणाला आली नसेल.

गौरी गडाखांच्या आत्महत्येनं खळबळ

7 नोव्हेंबर 2020…गौरी गडाख घरात मृतावस्थेत आढळल्या. पोलीस तपास सुरु झाला, आणि या तपासात गौरी गडाख यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. गडाख कुटुंबियांकडून यावर कुठलंही जाहीर भाष्य करण्यात आलं नाही. प्रशांत गडाखही काहीही बोलले नाही. मात्र, या घटनेच्या 2 महिन्यांनंतर प्रशांत गडाख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे..

प्रशांत गडाख यांची फेसबुक पोस्ट

प्रशांत गडाख यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी 2020) फेसबूकवर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यांनी गौरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. या पोस्टमधून त्यांच्यातील नातं किती घट्ट होतं, याचं दर्शन होतं.
ते लिहतात..

“गौरी तु मला हरवलं… माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे,आता कुणाशी लढु..तु माझी पत्नी नव्हती तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होती असं तुच मला म्हणायचीस ना.. तशीही तु मुडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीसं.. तु चेष्टेत मला म्हणायची कि, ‘तुमच्याआधी मीच जाणार’ पण तु अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली. साहेबांची सगळ्यात आवडती सुन नाही तर तु मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी .. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. “

रक्ताचं असलं तरी शिक्षा होईलच, गडाखांचा इशारा कुणाकडे?

याच पोस्टमध्ये प्रशांत गडाख यांनी मला कुणाचीही सहानुभूती नको असल्याचं म्हटलं आहे. ते लिहतात…

माझा नियतीवर भरवसा आहे.ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे. गौरी मी घरी नव्हतो, तु निष्प्राण..आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतुन.. गौरी,तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे.. मी आता खरंच फकीर झालोय

राजकारणात येण्याचे प्रशांत गडाख यांचे संकेत

राजकारणात न येण्याचं ठरवलेल्या प्रशांत गडाखांनी आता राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. पत्नीबद्दल लिहलेल्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते लिहतात…

मी राजकारणात येणार नाही पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की, मी राजकारणात यायचं कि नाही. पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही.

दु:खाचं गाठोडं प्रशांत गडाख कसं फेकणार?

प्रशांत गडाख यांनी आपल्या या लेखात दु:खाच्या गाठोड्याला उल्लेख करत, एका कवितेचा संदर्भ दिला आहे…
ते लिहतात…

नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे,ते मला घेऊनच चालावं लागेल. ‘वर्तमान जगायचंय मला’ ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती, ती अशा रितीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.

पण, त्यांनी जी कविता लिहली आहे, त्या कवितेत दु:खाच्या गाठोड्याबद्दलच्या त्यातील काही ओळीत लिहलं होतं…

मी ठरवलंय आता
जगण्यापेक्षा लढण्याची परिभाषा…

अन्याय, ठेचा, जखमा
सुगंधी करायच्यात मला..

कारण मरणाऱ्यांपेक्ष्या लढणाऱ्यांची
जिद्द वाढवायची इथे मला..

जखमांना बंदिस्त करुन गाठोड्यात
बांधून फेकायचंय नदीत मला..
आणि मनसोक्त पोहायचंय तिथे

त्यांच्या या कवितेत लिहल्याप्रमाणे प्रशांत गडाख आता दु:खाचं गाठोडं कधी फेकणार का? आणि नव्या उमेदीनं राजकारणाच्या या नदीत उतरणार का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण, त्यांच्या या फेसबूक पोस्टमध्ये राजकारणात उतरण्याचा उल्लेख आला आहे. प्रशांत गडाख राजकारणात आले, तर अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा वेगळी असेल असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

(Prashant Gadakh’s Facebook post after the suicide of his wife Gauri Gadakh)