प्रशांत किशोर यांनी पुन्हा विरोधकांना डिवचले, म्हणाले 4 जून रोजी भरपूर पाणी…
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीमध्ये भाजपच पुन्हा विजयी होईल असा दावा केला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. मात्र, त्याला प्रशांत किशोर यांनी एक ट्विट करून उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीमध्ये भाजपला 2024 च्या निवडणुकीतही विजय मिळेल असा दावा केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जितक्या जागा जिंकल्या होत्या तितक्याच जागा यावेळच्या निवडणुकीत भाजप जिंकेल असा दावा त्यांनी केला होता. तसेच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांचा प्राधान्यक्रम काय असेल याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. प्रशांत किशोर यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यावर प्रशांत किशोर यांनी एक ट्विट करून विरोधकांना डिवचले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे. 2 जून रोजी सातवा टप्पा पूर्ण होईल आणि 4 जून रोजी निकाल जाहीर होईल. प्रशांत किशोर यांनी भाजप पुन्हा विजयी मिळेल असा दावा केला आहे. विरोधकांनी त्यावरून प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली आहे. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी विरोधकांना 4 जून रोजी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. ‘पाणी पिणे चांगले आहे. कारण ते मन आणि शरीर दोन्ही हायड्रेट ठेवते. या निवडणुकीच्या निकालाचे माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी हातात ठेवावे. 2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यापूर्वी केलेले भाकीत लक्षात ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये भाजप तिहेरी आकडा गाठणार नाही असा दावा केला होता. तर, अनेक वाहिन्यांनी भाजपच्या विजयाचे भाकीत केले होते. मात्र, प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला होता. तर, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी “मला वाटते मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुनरागमन करत आहे. गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या असतील तितक्याच जागा मिळू शकतात किंवा त्यांची कामगिरी पूर्वीपेक्षा थोडी चांगली असू शकते. भाजप सरकारच्या विरोधात लोक निराश किंवा संतप्त असले तरी मोदी सरकार हटवल्याबद्दल फारसा राग नाही असे म्हटले होते.