सांगली : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही, असा दावा पाटील यांनी केलाय. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Jayant Patil’s reaction to MLA Pratap Saranaik’s letter)
“मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कुणी गेलंय, असं आता काही झालेलं नाही. त्यामुळे अशापद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईलं असं मला वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहिलं आहे, त्यांच्या मतदारसंघात असं काही झालं आहे का हे तपासून पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनापासून आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या दीड वर्षात मी आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीच कामे कशी झटपट होतात, आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही? असा सवाल केला आमदारांमधून केला जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी पसरली आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. पण युती तोडून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का? अशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब
प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे
Jayant Patil’s reaction to MLA Pratap Saranaik’s letter