अहमदनगरः अहमदनगरला कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) कोणत्याही क्षणी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले (Pravin Ghule) भाजपात (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत. कर्जत शहरात कालच कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. तर सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात जाण्याचा आग्रह धरण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वीच घुलेंनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची भेट घेतली होती. यापूर्वी विधानसभा आणि नगरपंचायती निवडणुकीत घुले यांनी रोहित पवारांना पाठींबा दिला होता. तर सध्या घुलेंची भावजय कर्जत नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष आहे. त्यामुळे रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.
यावेळी घुलेंनी रोहित पवारांचं नाव न घेता टीका करत अनेक आरोप केले. राज्यात सरकार आल्यानंतर सर्वांना वाटत होतं या तालुक्यात जोश पूर्ण काम होईल. विकासाच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या मात्र दुर्दैवाने कुठली गोष्ट झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय.
तसेच विकास कामाचे बाबतीत सामान्य माणूस आणि पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेतलं जात नव्हतं असंदेखील घुलेंनी म्हटलंय. सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बोलून दाखवला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
त्यामुळे दोन-तीन दिवसांत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या राजकारणातील कामाच्या पद्धती बदलल्या. अधिकाऱ्यांच्या काम करण्याची पद्धत बदलली. सामान्य माणसांना वेठीस धरण्याचं काम अधिकाऱ्यांकडून झालं… अधिकाऱ्यांवर दबाव होता.. असा आरोप त्यांनी रोहित पवारांचं नाव न घेता केला आहे.
प्रवीण घुले यांची कर्जत तालुक्यात मोठी ताकद आहे. ते जिल्हा परिषद सदस्य देखील होते. त्यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांची ताकद वाढणार आहे.