Pravin Darekar : छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावताना महाराजांच्या वंशजांची परवानगी घेता का?; दरेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Pravin Darekar : आपल्या पक्षाची पडझड होत असताना अशा पद्धतीने आजारपणाचे भांडवल केले जात आहे. सहानुभूती मिळाली असती. परंतु तुम्हाला संपत्ती मिळवायची होती. पालवी प्रत्येक गोष्टीला फुटते. त्यांनी पाणी घातले त्यांच्या कष्टाचे वैभव म्हणून तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले.
मुंबई: काही लोक माझे वडील चोरायला निघाले आहेत. त्यांना लढायचं तर बिनधास्त लढा. पण माझ्या वडिलांचे फोटो लावून मते मागू नका. तुमच्या आईबापांचे फोटो लावून मते मागा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला सुनावले होते. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाला भाजपचे (bjp) आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावताना त्यांच्या वंशजांची परवानगी घेता का? उलट छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागता? दाखले मागता? छत्रपतीच्या वंशजांना तुम्ही शिवबंधन बांधायला सांगता? असा सवाल प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. आपल्या पक्षाची वाताहत होत असल्याने ते सहानुभूती मिळवणं हे चुकीचं आहे. आजारपणाचं भांडवल करणं चुकीचं आहे. सिंपथी मिळवताना तुम्हाला संपत्ती महत्त्वाची वाटत आहे, असा हल्लाबोलही दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. आपल्या पक्षाची पडझड होत असताना अशा पद्धतीने आजारपणाचे भांडवल केले जात आहे. सहानुभूती मिळाली असती. परंतु तुम्हाला संपत्ती मिळवायची होती. पालवी प्रत्येक गोष्टीला फुटते. त्यांनी पाणी घातले त्यांच्या कष्टाचे वैभव म्हणून तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले. या लोकांना तडीपारी झाली. त्यांना पालापाचोळा म्हणणे हे चुकीचं आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.
तुम्ही छत्रपती चोरले का?
मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हीन पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे वारंवार टीका करत आहेत. हिंमत असेल तर संकटाला संधी समजा आणि पुढे जा. बाळासाहेब कोणाची खासगी प्रॅापर्टी नाही. त्यामुळे बाळासाहेबांवर मालकी सांगू नका. आतापर्यंत तुम्ही छत्रपती चोरले का? तुमच्यावर चोरीचा आरोप करावा का?, असा सवाल त्यांनी केला.
शिंदे कधीच पदाच्या मागे नाहीत
एकनाथ शिंदे कधीच पदाच्या मागे लागणार नाहीत. ते शिवसेना प्रमुखांच्या वैचारिक भूमिकेचं प्रतिनिधीत्व करत आहेत. हिंदुत्वाचे विचार घेऊन ते पुढे जात आहे. 50 आमदार फुटले, हे केवळ विचारांसाठी घडलं. आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कारटा ही वृत्ती बरोबर नाही. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदेच कौतुक केले आहे ते आठवा, असंही ते म्हणाले.
कर नाही तर डर कशाला?
आदित्य ठाकरे यांच्या खात्याची केंद्राने चौकशी सुरू केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कर नसेल तर डर कशाला? गैरव्यवहार असेल तर तपास केला जाईल, असंही ते म्हणाले. तसेच शिंदे सरकारचा लवकरच विस्तार होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.