नारायण राणे सडेतोड बोलतात पण…; प्रवीण दरेकर यांची विशेष टिपण्णी
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नारायण राणे यांच्या बोलण्याच्या शैलीवर भाष्य केलंय. काय म्हणालेत? पाहा...
कोल्हापूर : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी नारायण राणे यांच्या बोलण्याच्या शैलीवर भाष्य केलंय. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना दरेकरांनी राणेंच्या बोलण्याच्या स्टाईलवर टिपण्णी केलीय. संजय राऊत आणि राणेंमधील वादावर बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रात अशा पद्धतीचा वाद योग्य नाही. ती संस्कृती आहे. नारायण राणे (Narayan Rane) हे सडेतोड बोलतात ती त्यांची स्टाईल आहे. कधी कधी त्याचे समर्थन करता येणार नाही.”
संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळलेला दिसत आहे. 100 टक्के वैफल्यग्रस्त झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. हमरीतुमरीवर येणं म्हणजे राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचं दिसतंय, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर जोरदार टीका झाली. त्यावर दरेकरांनी भाष्य केलंय. गिरे तो भी टांग उपर!, असं अजित पवारांचं झालं आहे. विधान चुकल्यानंतर, विरोध झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती.पण अजित पवार यांचा अहंकार असा आहे कि आम्ही सगळ्यांच्यावर आहोत! तो अहंकार त्यांच्यातून जायला तयार नाही, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.
बच्चू कडू यांच्यावरही दरेकर बोललेत. घरो घरी मातीच्या चुली… एका घरात देखील मतमतांतरे असतात. आता इतकी मोठी सत्ता आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचे मत असू शकतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार असतात. अब्दुल सत्तारांच्या बाबतीत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. आमच्या एकीला कुठेही तडा जाणार नाही. अशा छोट्या मोठ्या कुरबुऱ्या आल्या तरी शिंदे आणि फडणवीस त्या संपवतील, असं दरेकरानी म्हटलंय.
सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे. शिंदे आणि फडणवीस त्यांच्या क्षमतेने अनेक निर्णय घेतले जातात. दोन वर्षे सोडा पुढचे 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू. काही अडचण नाही, असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत राहील असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केलाय.