Ghulam Nabi Azad : जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी, दोन वर्षापुर्वी दिलेल्या पत्राचा विचार व्हायला हवा होता – पृथ्वीराज चव्हाण
सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे.
मुंबई – कॉंग्रेस (Congress) मधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये (Senior Leader) मागच्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु असल्याची चर्चा होती. परंतु आज गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कॉंग्रेसच्या सगळ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्यावर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील राजीनाम्यानंतर आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. “त्यांनी दिलेलं पत्र मी वाचलं आहे. पत्रात ज्या बाबी नमूद केल्या आहेत, त्याचं बाबी आम्ही दोन वर्षांपूर्वी एका गोपनीय पत्राव्दारे दिली होती. त्यावेळी आम्ही पत्रात लिहिलं होतं की, पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा. काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडून आलेले सदस्य असावेत अशी आमची मागणी होती अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.
आमचा संवाद थेट सोनिया गांधी यांच्याशी झाला होता
ज्या उद्देशाने पत्र लिहिलं होतं, त्यावेळी आमचा संवाद थेट सोनिया गांधी यांच्याशी झाला होता. मात्र त्यावेळी कोणीतरी पत्र फोडलं. आम्हाला जर या बाबी सार्वजनिक करायच्या असत्या तर आम्ही नक्कीच पत्रकार परिषद घेतली असती. 24 वर्षात कोणतीच निवडणुक न झाल्यामुळे कोणतेच सामुदायिक निर्णय घेण्यात आले नाहीत असंही त्या गोपणीय पत्रात नमूद करण्यात आलं होतं असं चव्हाण यांनी सांगितलं.
सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी
सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे. सद्या हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु असताना सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही अपेक्षा शिल्लक नाहीत. काँग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे. काँग्रेसला प्रभावी विरोधी म्हणुन पुढे येणे गरजेचं आहे असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
सध्या शिवसेनेतील अंतर्गत वाद सुरू
पावसाळी अधिवेशन केवळ 7 दिवसांच होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यामुळे इतर विषय मागे पडले. सध्या शिवसेनेतील अंतर्गत वाद सुरू आहे. ईडीच्या कायद्याबाबत पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. याबाबतच्या अनेक याचिका सध्या प्रलंबित आहेत. ही मागणी करणाऱ्या चंद्रकांत हांडोरे या आमच्या सहकाऱ्यावरती अन्याय झाला. त्यामुळे ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी, तसेच अशी देखील शंका आहे की यामध्ये आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे समिती नेमण्यात आली. अहवाल देखील समितीने पक्षाच्या नेतृत्वाला पाठवला आहे. लोकांच्यावरती कधी कारवाई होणार याकडे आमचं लक्ष लागलं आहे.