शाह-फडणवीस गुरुचेल्याने दोन्ही काँग्रेसचे 40 नेते फोडले, विलासकाकांनाही आमिष, पृथ्वीबाबांचा गौप्यस्फोट
विलासकाकांनाही भाजपने आमिष दाखवले. मात्र स्वातंत्र्य सैनिकी परंपरेमुळे ते बळी पडले नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
कराड : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या गुरु-चेल्याने राज्यातील दोन्ही काँग्रेसचे (Congress NCP) चाळीस नेते फोडले. विलासकाका उंडाळकर (Vilaskaka Undalkar) यांनाही आमिष दाखवलं” असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे साताऱ्यातील दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. कराडमध्ये विलासकाकांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysingh Patil Undalkar) यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी चव्हाण बोलत होते. (Prithviraj Chavan lashes out at Devendra Fadnavis Amit Shah in Karad)
“विधानसभा निवडणुकांच्या वेळी उदयसिंह आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. यामुळे पक्षाची ताकद क्षीण झाली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या गुरु-चेल्याने राज्यातील दोन्ही काँग्रेस (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) 40 नेते फोडले. साम दाम दंड भेद वापरुन अनेक पक्ष फोडले” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“ज्यांना काँग्रेसची परंपरा आहे त्यांनी काँग्रेस पक्ष सुधारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विलासकाकांनाही आमिष दाखवले. काकांना स्वातंत्र्य सैनिकी परंपरा आहे. ते आमिषाला बळी पडले नाहीत” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“सर्व मिळून आता सातारा जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती सुधारणार आहोत. आजच्या मेळाव्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरली आहे. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी सुरु केलेले उद्योग पुन्हा सुरु राहिले असते, तर राज्याचे फार नुकसान झाले असते. म्हणून दगडापेक्षा वीट मऊ या हिशोबाने शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली” असं पृथ्वीराड चव्हाण म्हणाले.
कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता
पृथ्वीबाबा आणि विलासकाका या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरु होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटकाही बसला होता. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकर हे राजकीय विरोधक पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पृथ्वीबाबा विरुद्ध विलासकाका : कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता !https://t.co/sSIviTBzem @prithvrj
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीरपणे सक्रिय होत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसमध्ये सक्रीय होण्याचा निर्धार केला.
“ज्या विचारांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिलं, काही असामाजिक तत्त्व, समाजाला त्या विचारांपसानू दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संघर्ष असाच पुढे चालू राहिला असता तर त्यांना थोपवणं अडचणीचं झालं असतं आणि समाजाची हानी भरुन आली नसती. म्हणून संघर्ष मिटवून, मतांतरं संपवून, विचारांना प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा एकच अजेंडा आहे, काँग्रेसची विचारसरणी समाजात रुजवणे आणि समाजाचा विकासात्मक उत्कर्ष करणे” अशी प्रतिक्रिया उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली.
संबंधित बातम्या :
पृथ्वीबाबा विरुद्ध विलासकाका : कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता !
“आता एकच अजेंडा…” काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, पृथ्वीबाबा-विलासकाका एकत्र
(Prithviraj Chavan lashes out at Devendra Fadnavis Amit Shah in Karad)