मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राजकारण होत आहे यात काही शंका नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल, असं स्पष्ट मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. युवक काँग्रेसच्या वेब सेमिनारमध्ये ते बोलत होते. (Prithviraj Chavan on Uddhav Thackeray appointment as Governor elected MLC)
भारतीय राज्यघटनेप्रमाणे एकदा मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं की मग, मंत्रिमंडळाचा अधिकार हा सर्वोच्च असतो. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्य करायचं असतं, त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करावा लागतो. मंत्रिमंडळ गठन व्हायच्या आत, कोणाला मुख्यमंत्री करायचं, याचे राज्यपालांकडे भरपूर स्वेच्छाधिकार असतात. तो यावेळी वापरलाही गेला. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं केवळ 80 तासांचं सरकार झालं. परंतु एकदा सरकार अस्तित्वात आलं, उद्धव ठाकरे यांचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. की त्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला, किंवा त्यांनी दिलेला जो निर्णय असेल, शिफारस असेल, ती राज्यपालांना मान्यच करावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आपल्या राज्यघटनेप्रमाणे राज्यपाल 12 जणांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने विधानपरिषदेवर नियुक्त करतात. मी मुख्यमंत्री असताना 2014 मध्ये 12 जणांना आमदार म्हणून विधानपरिषदेवर नियुक्त केलं होतं. त्याची मुदत 6 जून 2020 रोजी संपणार आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा : अर्थचक्रासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा उपाय, केंद्राला अधिकच्या नोटा छापण्याचा सल्ला
‘आता इतर काही मार्ग नाहीत. कारण कोरोनामुळे निवडणूक आयोग त्या-त्या निवडणुका घेणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाच्या कुठल्या तरी सदनात सदस्य व्हावं लागेल. विधानसभेवर जाता येणार नाही, कारण निवडणुका होणार नाहीत. त्यासाठी विधानपरिषदेवर जावं लागेल. राज्यपालांच्या नियुक्तीच्या अधिकाराअंतर्गत त्यांना नियुक्त करावं, अशी शिफारस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने एकमताने केली आहे. त्या बैठकीचं अध्यक्षपद अजित पवार यांनी केलं, कारण हा विषय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातला होता. ते कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हते, त्यांनी स्वतःला त्यापासून दूर ठेवलं होतं’ अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
‘राज्यपालांना 6 एप्रिलला उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत सल्ला दिला गेला. आता जवळपास 20 दिवस किंवा तीन आठवडे होऊन गेले आहेत. राज्यपाल त्यावर अजून काही निर्णय घेत नाहीत. ते अद्भुत आहे. असं कधी घडत नाही. त्यामुळे राज्यपाल राजकारण करत आहेत, असं म्हणायला वाव आहे. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा आणि अनिश्चितता संपवून टाकावी. कारण उगीच उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. एका बाजूला कोरोनाचं संकट आहे. त्यामध्ये मंत्रिमंडळात अस्थिरता निर्माण करुन कोणाची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असेल, तर तो अत्यंत दुर्दैवी आहे.’ असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं.
आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारला नोटा छापाव्या लागतील, पृथ्वीराज चव्हाण यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, मिळेल तेवढं कर्ज घ्यावे लागेल-पृथ्वीराज चव्हाण, युवक काँग्रेसच्या वेब सेमिनारमध्ये केलं वक्तव्य @prithvrj @AjitPawarSpeaks @narendramodi @RBI @TV9Marathi @satyajeettambe
— Sunil kale (@Ksbsunil) April 28, 2020