प्रियांका गांधी अॅक्शनमध्ये, दुपारी दीड ते पहाटे पाचपर्यंत मॅरेथॉन बैठका
नवी दिल्ली/लखनऊ: काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशात जोरदार कामाला सुरुवात केली. प्रियांका गांधी यांनी पहिल्याच दिवशी मंगळवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी बैठकांना सुरुवात केली. ही बैठक थोडीथोडकी नव्हे तर बुधवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी संपली. म्हणजेच जवळपास 16 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकांमध्ये प्रियांकांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसमधील अंतर्गत […]
नवी दिल्ली/लखनऊ: काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशात जोरदार कामाला सुरुवात केली. प्रियांका गांधी यांनी पहिल्याच दिवशी मंगळवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी बैठकांना सुरुवात केली. ही बैठक थोडीथोडकी नव्हे तर बुधवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी संपली. म्हणजेच जवळपास 16 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकांमध्ये प्रियांकांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचा पवित्रा घेतला. या 16 तासांमध्ये प्रियांका गांधींनी अन्नाचा कणही शिवला नाही.
“जुन्या काँग्रेसमधील वादाने काम चालणार नाही, नव्याने सुरुवात करावी लागेल, सगळे वाद सोडून जोमाने कामाला लागा”, असा थेट आदेश प्रियांका गांधी यांनी दिला.
या बैठकांसाठी प्रियांका गांधी काल जयपूरवरुन जवळपास दुपारी 12.45 वाजता उत्तर प्रदेशात पोहोचल्या. तिथून त्या थेट काँग्रेस कार्यालयात आल्या. त्यांनी ना दुपारी जेवण केलं ना रात्री जेवल्या. सतत बैठकांचं सत्र चालूच ठेवलं. या बैठकांदरम्यान अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रियांकांनी आक्रमक रुप धारण केलं. जे शांतपणे ऐकतील त्यांना शांत शब्दात, जे ऐकणार नाहीत त्यांना कडक शब्दात प्रियांकांनी सुनावलं.
या बैठकीदरम्यान प्रियांकांना फूलपूरच्या कार्यकर्त्यांनी फूलपूरमधील लोकसभा लढण्याचा आग्रह केला. त्यावेळी प्रियांकांनी आपल्यावर अनेक जागी लढण्यासाठी दबाव असल्याचं सांगितलं. मात्र मी निवडणूक लढणार नाही, पक्ष मजबूत करणार असल्याचं जाहीर केलं.
5 ते 15 मिनिटांची वेळ पूर्व उत्तर प्रदेशची धुरा सांभाळणाऱ्या प्रियांका गांधींनी सर्व कार्यकर्त्यांची बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना म्हणणं मांडण्यासाठी 5 ते 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. जर कोणी जास्त वेळ घेतला तरी प्रियांका त्याचं म्हणणं ऐकत होत्या. मी तुमच्या मनातलं ऐकण्यासाठी आले आहे, तुमचं संपूर्ण म्हणणं मांडा असं त्या कार्यकर्त्यांना सांगत होत्या.
नो सेल्फी प्रियांका गांधी पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटल्या. त्यामुळे उत्साही कार्यकर्ते प्रियांकांसोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना सेल्फी घेण्यास मज्जाव केला. मात्र प्रत्येक बैठकीनंतर प्रियांकांनी कार्यकर्त्यांसोबत ग्रुप फोटो घेतला.